(मुंबई)
मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेकडून मंगळवारी देण्यात आलेल्या जाहिरातीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत:चे वर्चस्व दाखविण्यासाठी व फडणवीसांना दुय्यम स्थान त्या जाहिरातीत दिल्याने युतीत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, आता तापलेल्या राजकारणावर पडदा टाकण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आज शिवसेनेकडून आपली चूक सुधारत जाहिरातबाजी करण्यात आली आहे.
‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीने मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला. शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे शिंदे-फडणवीस युतीत बिघाड झाल्याची व फडणवीस नाराज झाल्याची चर्चा रंगली. शिंदे गटाने केलेल्या या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र असल्यानेही आरोप-प्रत्यारोप झाले.
राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना दिलेल्या या जाहिरातीमुळे जनमानसात राज्य सरकारविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याकरता आज शिंदे गटाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही त्यांनी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना जाहिरात देऊन ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीला ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या मथळ्याखाली जाहिरातीचा उत्तरार्ध केला.