उद्धव ठाकरे आजारी असताना एकनाथ शिंदे यांनी बंडाची तयारी केली होती, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना कोण परदेशात जाऊन आनंदोत्सव साजरा करत होतं, हे सर्वांनाच माहिती असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या शाही हॉटेलच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादेत आले होते. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि आमदार रमेश बोरनारे हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मला शिवसेनेच्या प्रॉपर्टीचा मोह नाही, परंतु मी उद्धव ठाकरेंना काय काय दिलंय, हे सांगायला लावू नका, असं म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. मी देणारा आणि घेणाराही आहे, त्यामुळं मला काही गोष्टी ठाकरे गटानं सांगायला लावू नये, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे आजारी असताना परदेशात जाऊन कोण आनंदोत्सव साजरा करत होतं, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळं त्यावेळी काय घडलं होतं हे इतिहासजमा झालेलं आहे. कुणी कशामुळं बंड केलं आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे, याची माहिती सर्वांनाच असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढला आहे. त्यामुळं आता यावरून ठाकरे आणि शिंदे गटात आणखी राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.