(देवरूख /सुरेश सप्रे)
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी शिवसेनेचे तालुकाप्रमुख (शिंदे गट) प्रमोद पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत २७ वर्षे तालुकाप्रमुख पदावर कार्यरत असलेले प्रमोद पवार यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करून मोठे बंड केले होते. त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करून त्यांना पद देवून गौरविण्यात आले आहे.
या निवडीने शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पदाचा वापर जनसामान्यांची अनेक कामे मार्गी लावत शिवसेनेचा झेंडा अटकेपार नेण्यासाठी तसेच संघटना मजबूत करण्यासाठी व देवरूख पंचायत समिती व नगर पंचायतीवर पुन्हा भाजप- सेना युतीचा भगवा फडकविणेचा निर्धार प्रमोद पवार यांनी व्यक्त केला आहे.
त्यांचे निवडीबद्दल माजी आम. सदानंद चव्हाण, माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, आंबवचे उप सरपंच बाळा माने, प्रसाद सावंत यांचेसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.