राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेने जैतापूर प्रकल्प विरोधाचे ढोल बढवायला सुरूवात केली आहे. मात्र ज्या पाच गावातील स्थानिक प्रकल्पग़्रस्त जनतेने मोबदला स्विकारला आहे त्या जनतेला प्रकल्प हवा आहे व यातुन त्यांनी प्रकल्पाला संमती दिल्याचेच पुढे आले आहे. त्यामुळे शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध हा राजकिय स्वार्थासाठी असून शिवसेनेने ही नौटंकी आता बंद करावी असा टोला भाजपाचे तालुका उपाध्यक्ष राजा काजवे यांनी लगावला आहे.
जर ९८ टक्के प्रकल्प ग्रस्त मोबदला स्विकारत असतील तर मग विरोध कोणाचा असा खडा सवाल उपस्थित करून सर्वसामान्य गोरगरिब जनतेला फसविण्याचे धंदे आता शिवसेनने बंद करावेत असा घणाघातही काजवे यांनी केला आहे.
प्रस्तावित जैतापूर प्रकल्प विरोधी आंदोलनाच्या लढयात कायमच अग्रभागी असलेले व तुरूंगवास भोगलेल्या राजा काजवे यांनी विकासाच्या मुद्यावर जैतापुर अणुऊर्जा व रिफायनरीचे समर्थन करत शिवसेनेला रामराम ठोकून भाजपामध्ये आले आहेत. त्यांनी आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या या प्रकल्प विरोधी बेगडी भुमिकेवर तोफ डागली आहे.
हा प्रकल्प नको म्हणून आंम्हीही प्राणपणाने लढा दिला. मात्र तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रकल्पग्रस्तांना वाढीव साडेबावीस लाखाची मदत जाहिर केली आणि मग प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला स्विकारण्यासाठी शासनदरबारी रांगा लागल्या. यात अगदी त्या त्या गावातील शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारीही पुढे होते. आजपर्यंत प्रशासनाकडून प्राप्त माहितीप्रमाणे सुमारे ९८ टक्के प्रकल्पग्रस्तांनी मोबदला स्विकारला आहे. त्यामुळे एक प्रकारे स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी या प्रकल्पाला संमतीच दिली आहे असे काजवे यांनी नमुद केले. त्यामुळे आंम्ही जनतेसोबत, स्थानिकांचा विरोध ही नौटंकी आता शिवसेनने बंद करावी असा टोला काजवे यांनी गावला आहे.
आपणही यापुर्वी प्रकल्पांच्या विरोधाच्या भुमिकेत होतो, मात्र आंम्ही जीव तोडून विरोध करायचा आणि शिवसेनेच्या लोकांनी मदत घ्यायची, शिवसेननेच्या मंत्री, खासदार आणि आमदारांनी प्रकल्प विरोधी भुमिका घ्यायची पण स्थानिक जनतेला ना रोजगार ना उत्पन्न वाढीचा मार्ग आणि ना त्यासाठी प्रयत्न मग हे कशासाठी असा खडा सवाल काजवे यांनी उपस्थित केला. अशा प्रकारे आपला राजकिय स्वार्थ साधण्यासाठी शिवसनेने स्थानिक सामान्य जनतेची दिशाभुल करत अशा प्रकल्पांना विरोध करून घोर फसवणूक केल्याचा आरोप काजवे यांनी केला आहे.
प्रकल्पस्थळी कामे झाली, कंपाऊंड वॉल झाले, यात कुणी ठेके घेतले हे देखील जगजाहिर आहे. असे नमुद करत हा प्रकल्प मार्गी लागला पाहिजे व यातुन स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे अशी आपली मागणी असल्याचे काजवे यांनी सांगितले.
या प्रकल्पाला साखरीनाटे परिसरासह अन्य मच्छीमार बांधवांचा विरोध आहे. त्यांचा या प्रकल्पाशी थेट संबध येत नाही, वा त्यांची जमिन नाही. मात्र त्यांच्या पारंपारिक मच्छी व्यवसावर परिणाम होईल अशी त्यांना भिती आहे. याबाबतही योग्य प्रकारे प्रबोधन होणे, सत्य माहिती मिळणे आवश्यक आहे, शासन आणि कंपनीच्या प्रतिनिधींनी मच्छीमार बांधवांशी चर्चा करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातुन या मच्छीमारांना काय देता येईल, याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे असेही काजवे यांनी सांगितले. मच्छीमारांचा तोटा होता नये, त्यांच्या व्यवसायावर परिणाम होता कामा नये यासाठी प्रभावी उपाययोजना केली पाहिजे असेही काजवे यांनी सांगितले.