(रत्नागिरी)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना ‘ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पवारांच्या चरणात नेऊन ठेवली’ असा हल्लाबोल केला होता. तर उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा उल्लेख ‘मोगँबो’ असा केला होता. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी मुंबईतील शिवसेना भवनात जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि शिंदे-फडणवीसांवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. त्यामुळं आता यावरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगाला पक्षात निवडणुका व देशात निवडणुका पाहिजेत. परंतु निवडणूक आयोगाचे आयुक्त यांची नेमणूक कशासाठी करायची?, सुप्रीम कोर्टातील कॉलॅजियम पद्धतीवर आक्षेप घेण्यात आला होता, परंतु तिथं न्यायमूर्ती खंबीर राहिल्यामुळं मोदी सरकारला माघार घ्यावी लागली, सध्या सरकारचं वर्तन पाहता देशात २०२४ साली हुकुमशाही येणार आहे, असं मला वाटतं. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आपल्याला मिळालेलं नाही. परंतु मशाल आपल्याकडे आहेच, याशिवाय माझ्या मनात दहा चिन्ह आहेत. पदाधिकाऱ्यांनी कोणतीही चिंता न करता संघर्षासाठी तयार रहायला हवं, भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री अमित शहा यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
निवडणुकीचं चिन्ह आणि नाव ठरवणं किंवा देशात निवडणुका घेणं याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, एखादा पक्ष कुणाचा आहे, हे निवडणूक आयोग कसं काय ठरवू शकतो?, असा सवाल ठाकरेंनी केला आहे. निवडणूक आयोग म्हणजे काय सुलतान नाही. शिवसेनेच्या पक्षनिधीवर निवडणूक आयोगाला डल्ला मारण्याचा अधिकार नाही. त्यामुळं केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करण्यात यावं, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
आता हे प्रकरण फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात पेटत जाणार असल्याचंही ठाकरे म्हणाले. २०१४ साली युती भाजपनं तोडली होती, २०१९ साली मला त्यांनी शब्द देऊन भाजपनं मला दगा दिलेला आहे. त्यामुळं आता त्यांना जनता धडा शिकवणार असल्याचं सांगत ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.