( नवी दिल्ली )
आपण व आपल्या कुटुंबाने 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेना पक्ष चालवला आहे, परंतु आज आपण आपल्या वडिलांचे नाव व चिन्ह वापरू शकत नाही, असे सांगतानाच शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आदेशाचे गंभीर परिणाम आपल्यासाठी होत आहेत, असे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले.
दरम्यान कालच्या सुनावणी दरम्यान शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रथम दर्शनी सुनावणीशिवाय, कोणत्याही बाबी लक्षात घेता आणि एकूण प्रकरणावर कोणतीही चर्चा न करता घेतल्याचाही आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणा-या ठाकरे यांच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान ठाकरे यांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला.
न्या.संजीव नरुला यांच्यासमोर ही सुनावणी आज मंगळवारी ता. १५ला सुरू रहाणार आहे. न्यायालयाने काल दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर दोन्ही पक्षांना या मुद्द्यावर त्यांचे लेखी म्हणणे दाखल करण्याचे निर्देश दिले.