(मुंबई)
स्वराज्यभूमी कोकण महोत्सवात बोलताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचे वक्तव्य केले होते. यावर चहुबाजूंनी टीका होऊ लागल्यावर लाड यांना दिलगिरी व्यक्त केली आहे.
कोकण महोत्सवात बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली,”असे प्रसाद लाड यांनी म्हटलं. यावरून चौफेर टीका होऊ लागल्यानंतर प्रसाद लाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात येत आहे. याची सुरुवात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा,शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी असे विधान केल्याने सगळीकडून टीका होत होती. तर या प्रकरणात दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या,असा खोचक टोला राष्ट्रवादीने भाजपला हाणला होता.
यानंतर आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण देताना प्रसाद लाड म्हणाले की, शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. स्वराज्य कोकण भूमी या कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली, असे म्हटलं होतं. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं अनावधानाने माझ्याकडून बोललं गेलं. मात्र, माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादव यांनी चूक दुरुस्त करत महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाल्याचं सांगितलं. माझ्या विधानाने जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे प्रसाद लाड म्हणाले.