(रत्नागिरी)
शिवप्रसाद महाजनी फाउंडेशनतर्फे फक्त दहा रुपयांत तीन पोळ्या व भाजी हा उपक्रम कष्टकरी लोकांसाठी आजपासून शहरातील श्री विठ्ठल मंदिर परिसरात सुरू झाला. आज मार्गशीर्ष गुरुवारचा मुहुर्त साधून पहिल्या दिवशी भाजीविक्रेत्या महिला, छोटे स्टॉल्स लावून गुजराण करणाऱ्या मंडळींना मोफत पोळी- भाजी देण्यात आली. या उपक्रमाबद्दल या सर्व कष्टकरी मंडळींनी आनंद व्यक्त केला.
या वेळी श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष आनंद मराठे, विजय पेडणेकर, माजी नगरसेवक राजू तोडणकर, शिवप्रसाद महाजनी फाउंडेशनच्या अध्यक्ष अॅड. रुची महाजनी, विश्वस्त राजेश भुर्के, अॅड. गौरव महाजनी, अस्मिता वाडेकर, अपर्णा आंबेकर, अॅड. प्रशांत पाध्ये, डॉ. गिरीश बिडीकर, डॉ. उमा बिडीकर आदी उपस्थित होते. महाजनी फाउंडेशनला रामरोटी उपक्रमामध्ये मैत्री ग्रुपच्या सुहास ठाकुरदेसाई व कौस्तुभ सावंत यांचे सहकार्य लाभत आहे. २०१६ पासून शिवप्रसाद महाजनी ट्रस्टने रामरोटी उपक्रमाचा प्रारंभ जिल्हा शासकीय रुग्णालयात केला. ग्रामीण भागांतून आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना अल्प दरामध्ये भाजीपोळी देण्याचा हा उपक्रम आहे.