(खेड / भरत निकम)
खेड तालुक्यातील शिवतर येथील तलाठी अमोल महावीर पाटील (३१ वर्षे), तलाठी सजा शिवतर, याला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडिलांचे निधन सन २०१४ साली झाले होते. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या जमीन मिळकतीचा वारस तपास होऊन तक्रारदार यांची नावे दाखल करण्यास तलाठी अमोल पाटील सजा शिवतर याने तक्रारदार यांच्याकडे १ हजारांची लाच रक्कमेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकारी यांना दिली होती. त्या अनुषंगाने दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी या तक्रारीची पडताळणी केली होती. त्यानंतर ५०० रुपयांची लाच रक्कम मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानुसार, सोमवार दि. २८ ऑगस्ट रोजी सापळा रचून लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात भ्र. प्र.अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे लाच मागणी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई पथकात पोलीस निरीक्षक अनंत कांबळे, पोलीस हवालदार विशाल नलावडे, पोलीस काॅन्टेबल राजेश गावकर, महिला पोलीस काॅन्टेबल वैशाली धनवडे चालक पोलीस नाईक प्रशांत कांबळे यांनी कारवाई केली आहे.