(रत्नागिरी)
सध्या चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शिळ धरण भरुन वाहू लागले आहे. धरणाच्या सांडव्या वरुन पाणी जाऊ लागले लागल्यामुळे नदीपात्राची पातळी वाढलेली आहे. या सांडव्यापासून काही अंतरावर असलेला डोंगराचा भाग यंदाच्या पावसात खाली येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी शहराला लागणारे पाणी पुरवठा करण्यासाठी शिळ येथे धरण बांधण्यात आले. पाण्याची वाढती गरज लक्षात घऊन धरणाची साठवण क्षमता वाढविण्यात आली. त्यासाठी शेजारी सांडवा बांधण्यात आला होता. गेल्या महिन्याभरात रत्नागिरीत सरासरी पावसाची नोंद चांगली झाली आहे. त्यात धरणक्षेत्रांमध्ये पाऊस समाधानकारक आहे. त्याचा फायदा शिळ धरणातील पाणी साठा वाढीला झाला आहे. आठ दिवसांपुर्वीच धरणातील सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. यंदा रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मे महिन्याच्या अखेरीस एक दिवसाआड पाणी सुरु ठेवण्यात आले. मॉन्सून लांबल्यामुळे मृत साठा वापरण्याची वेळ आली होती; परंतु 9 जुन नंतर अधुनमधून पडणार्या सरींनी दिलासा दिला. धरण क्षेत्रातही पाणी वाढू लागले. सध्या धरणात पुरेसा साठा झाला असून सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
मुसळधार पावसाचा जोर वाढला सांडव्यापासून काही अंतरावर असलेल्या भागात भुस्खलन होते. गेली पाच वर्षे सातत्याने येथील डोंगरातील दगड, माती कोसळत आहे. धरण भरुन वाहू लागल्यामुळे भविष्यात येथील भाग कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गतवर्षी कोसळलेल्या दरडीपासून काही अंतरावर घरे आहेत. त्या घरांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. पावसाचा जोर जुलै महिन्यात वाढत असल्याने भुस्खलनाची टांगती तलवार कायम राहणार आहे.