( संगलट / वार्ताहर )
दापोली तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यानी जप्त केलेला वाळूसाठा, आठ लाख रुपये किमतीचे सक्शन पंप, बोट व अन्य साहित्य चोरून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उर्वरित दोघा संशयितांना दापोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्यापैकी एकाची प्रकृती खालावल्याने त्याला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे.
शिरवणे गावाजवळ असलेल्या कोडजाई नदीपात्रात महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी यांनी १३ नोव्हेंबरला कारवाई केली होती. नदी किनारी असलेल्या जागेत साठा केलेली सुमारे १० ते १२ ब्रास वाळू तसेच नदीपात्रात सक्शन पंप बसविलेली बोट व अन्य साहित्य असा एकूण ८ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तो शिरवणे येथील पोलीस पाटील उमेश तुळशीराम येलवे यांचे ताब्यात दिला होता. यासंबधी गुन्हाही दाखल करण्यात आला होता. २१ नोव्हेंबरला सकाळी जप्त मुद्देमाल ठेवलेल्या चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. पप्पू कोळी (रा. ठाणे, सध्या दापोली), सागर शांताराम रेमजे, सिद्धेश सुरेश करमरकर (रा. कोल्हापूर), किशोर गुरव (रा. दाभिळ) या ४ संशयितांनी सर्व साहित्य ऐवज चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल झाली. पोलिसांनी या ४ संशयितांवर गुन्हाही दाखल केला होता. यापैकी दोघांना अटक करून सध्या ते जामिनावर आहेत. तर या प्रकरणातील मुख्य संशयित प्रफुल्ल कोळी व अन्य एका संशयिताला दापोली पोलिसांनी अटक केली आहे.
दापोली तालुक्यातील शिरवणे येथे बेकायदेशीर वाळू उपशासाठी वापरण्यात आलेली बोट सक्शन पंप अजूनही पोलसांच्या हाती लागलेली नाही. त्यामुळे काही वर्षपूर्वी पांगारी येथील क्रेन चोरीप्रमाणे हा मुद्देमाल हाती लागेल अशी शक्यता दिसत नाही, अशी चर्चा येथील नागरिकांमध्ये आहे.