(रत्नागिरी)
शिमग्याचं पोस्त ५ हजार रुपये द्या, अशी मागणी करत फर्निचर विक्रेत्या दुकानदाराची मान धरुन मारहाण करणार्या तरुणांना जमावाने चांगलाच चोप दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास कॉंग्रेस भवन परिसरात घडली.
भर रस्त्यात हाणामारी सुरू झाल्यानंतर शिमगोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांची धावपळ उडाली. याचदरम्यान पोलीस घटनास्थळी धावले आणि दुकानात घुसून धुडगूस घालणार्या तरुणांना ताब्यात घेतले.
सोमवारी रात्री बारानंतर बारावाड्यांच्या शिमगोत्सवाला सुरुवात होणार आहे. या शिमगोत्सवाची रंगत दोन दिवसांपासून रत्नागिरीत पहाायला मिळत आहे. चाकरमानीदेखील शिमगोत्सवासाठी रत्नागिरीत दाखल झाले आहेत. त्यामुळे हौशा-नवशांची या शिमगोत्सवात चांगलीच चंगी सुरू झाली आहे. तळीरामांनी तर शिमगोत्सवाच्या नावाखाली येणार्या जाणार्या प्रत्येकाला गाठून आपली ‘सोय’ लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असाच प्रकार शहरातील कॉंग्रेस भवन परिसरात घडला, मात्र ५ हजार रुपयांचे पोस्त मागणं ४ तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.
रत्नागिरीत शिमगोत्सवाची धामधूम सुरू आहे. शिमगोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली असली तरी बाजारपेठा मात्र खरेदीसाठी उघड्या आहेत. याचाच फायदा घेत चार तरुण अगदी तर्रर्र होऊन कॉंग्रेस भवन परिसरात सायंकाळच्या वेळेस आले होते.
या चारही तरुणांच्या पोटात आक्काबाईचा ‘संचार’ चांगलाच संचारला होता. बेभान झालेले हे तरुण एका फर्निचरच्या दुकानात शिरले. अगदी राजेशाही एन्ट्री या दुकानात केली. दुकानात गेल्यानंतर दोघेजण कोचावर बसले तर दोघेजण खुर्च्यांवर जाऊन बसले.
जे चार तरुण दुकानात शिरले ते गिर्हाईक असावेत, असा समज दुकान मालकाचा झाला. म्हणून दुकानमालक काय हवंय? विचारण्यासाठी पुढे धावला. यावेळी दुकानदाराने त्यांना विचारणा केली. मात्र यातील एकाने सांगितले, शिमगा आहे काय ते बघा…!
शिमगोत्सवात पोस्त मागण्याची परंपरा आहे. मात्र या परंपरेला फाटा देत काहीजणं आता खंडणीच वसुल करण्याचा प्रयत्न करत असतात. या दुकान मालकाकडे ५ हजार रुपयांचे पोस्त या तरुणांनी मागितले आणि त्या दुकानदाराला रक्कम एकून टराटर घाम फुटला.
५ हजार रुपयांचे पोस्त देण्यास दुकानदाराने नकार दिला. त्यानंतर दुकानात शिरलेले चारही तरुण लालेलाल झाले आणि त्यांनी दुकानमालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. बोलाचाली सुरू असताना प्रकरण हमरीतुमरीवर जाऊन पोहोचले. बघता बघता या चारही तरुणांनी दुकानमालकाची मान पकडली.
दुकानमालकाने ५ हजारांचे पोस्त दिल्यानंतर त्या चारही तरुणांनी फर्निचर दुकानात अक्षरश: धुडगूस घातला. येथील गोदरेजचे कपाट पाडून नुकसान केले. यावरच न थांबता एक देव्हारादेखील यातील एका तरुणाने उडवून दिला. आपले साहित्य वाचवण्यासाठी मालक जिवाचे आकांडतांडव करत होता.
कॉंग्रेस भवन येथील फर्निचरच्या दुकानात हाणामारी सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील पब्लिक दुकानमालकाला वाचवण्यासाठी पुढे धावले. यावेळी या तरुणांनी पुढे आलेल्या लोकांसोबत अरेरावी केली आणि मग काय जे व्हायचे ते पुढे घडलेच.
पब्लिक पुढे धावल्यानंतर अरेरावी करणार्या त्या चारही तरुणांना पब्लिकने चांगलाच चोप दिला. १५ मिनिटे दे दणादण सुरूच होते. कॉंग्रेस भवनच्या नाक्यावर हाणामारी सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीस घटनास्थळी धावले.
या प्रकरणात पोलिसांनी दुकानात धुडगुस घालणार्या चारही तरुणाना ताब्यात घेतले आहे. तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर तरुणांची पाठराखण करण्यासाठी काहीजण त्या दुकानमालकाशी समझोता करण्यासाठी धावले होते. मात्र दुकानमालकाने त्याला नकार दिला होता. पोलिसांनी सार्यांना पोलीस स्थानकात नेल्यानंतर उशिरापर्यंत त्यावर कार्यवाही सुरु होती.