(संगमेश्वर / जे . डी . पराडकर)
शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र ठिकाणी केवळ कर्तव्य म्हणून नव्हे , तर स्वतःला पूर्णत: झोकून देवून काम केले , तर अपेक्षित परिणाम साधता येतात . अत्यंत तळमळीने काम केले , तर विद्यार्थी शिक्षक पालक आणि ग्रामस्थांमध्ये एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते . आपल्या कामाच्या माध्यमातून ग्रामस्थांची मनं जिंकली , तर अशक्य ते देखील शक्य करुन दाखवता येते . ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा , कठोर परिश्रम घेतले आणि विविध शैक्षणिक प्रयोग राबवले , तर उच्च पातळीवर नेता येतो . वेळेचे बंधन पाळले , तर विद्यार्थी आपोआप शिस्तप्रिय होतात . अशा एक ना अनेक गुणांनी आपले ज्ञानदानाचे पवित्र काम एक शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी अशा ३९ वर्षांच्या प्रदीर्घ आणि सर्वांच्या कायम लक्षात राहिल अशा सेवेनंतर ३१ ऑगस्ट २०२३ रोजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री . विनायक वसंत पाध्ये हे सेवानिवृत्त होत आहेत . ऑक्टोबर १९८४ साली दुर्गम आणि डोंगराळ भागात एक शिक्षकी शाळेवर महिना ३०० /- रुपये मानधन तत्वावर नेमणूक आदेश मिळाल्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ धोंगडवाडी येथे हजर होवून पुढे काही वर्षे केवळ एकट्याने आणि नंतर एका सहकारी शिक्षकाच्या समवेत , कालांतराने बहुशिक्षकी शाळेत , जिल्हा परिषद रत्नागिरी येथे विषयतज्ञ , गुणवत्ता विकास उपक्रमात , सांख्यिकी सहाय्यक , नंतर उच्च श्रेणी मुख्याध्यापक , पदवीधर शिक्षक , गेले १८ महिने शिक्षण सेवेच्या उत्तरार्धात शिक्षण विस्तार अधिकारी अशा अनेक पदांवर शैक्षणिक सेवा करुन जवळजवळ ३९ वर्षे सेवेच्या प्रदीर्घ अनुभवानंतर ३१ ऑगस्ट २०२३ रोजी श्री . विनायक वसंत पाध्ये हे पवित्र अशा शिक्षण क्षेत्रातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत . त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या शैक्षणिक कार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा .
श्री . विनायक वसंत पाध्ये यांचे मूळ गाव संगमेश्वर तालुक्यातील गोळवली . संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे हे गाव. सन १९८४ साली महाराष्ट्र शासनाने दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये वाडी तेथे शाळा या तत्वावर शाळा स्थापन केल्या . प्रत्येक नव्या शाळेवर एक शिक्षक नियुक्त केला गेला . त्यावेळी एंप्लायमेंट एक्सचेंज या विभागा मार्फत नोकरीची संधी दिली जायची . त्यांच्या मार्फत जिल्हा परिषद शाळेत भरती करताना विनायक पाध्ये यांनाही शिक्षक नियुक्ती आदेश प्राप्त झाला . यानुसार ५ ऑक्टोबर १९८४ रोजी तुरळ धोंगडवाडी संगमेश्वर या शाळेवर पाध्ये हजर झाले . त्यावेळी त्यांचे देवरुख येथे महाविद्यालयीन शिक्षण सुरु होते . तुरळ बस थांब्यापासून ६ किमी अंतरावर हा गाव . धुळीचा रस्ता आणि घाटी त्यामुळे पायी प्रवास . पहिल्याच दिवसाचा अनुभव विलक्षण होता . तुरळ नं १ शाळेतील शिक्षक संतोष करकरे यांनी शाळेत हजर करुन घेतले . त्या दिवसापासून ‘ गुरुजी ‘ हा पवित्र शब्द पाध्ये यांच्या नावापुढे जोडला गेला .
दररोज एस . टी . बसने २० पैसे तिकीटात तुरळ पर्यंत पोहचल्यानंतर पुढे एक तासाचा पायी प्रवास हा दररोज ठरलेलाच असे . कितीही दमछाक झाली तरी उत्साह कायम ठेवावा लागे . अशावेळी तुरळ गावामध्ये त्यांना एक देव माणूस भेटला . रघुनाथ वामन करकरे हे पूर्वी संगमेश्वर पं . स . चे उपसभापती होते . रघुभाऊंनी पाध्ये यांची स्वतःच्या घरीच रहाण्याची सोय केली . कुटूंबातील एक सदस्य या नात्याने पाध्ये १२ वर्षे त्यांच्याकडे राहिले . रघुभाऊ आणि त्यांच्या पत्नी प्रेमावहिनी या उभयतांनी पाध्ये यांच्यासाठी जे काही केले ते कधीही विसरण्यासारखे नाही . अशी माणसे मिळण्यासाठी भाग्य आणि पूर्व पूण्याई आवश्यक असते . तुरळ धोंगडवाडी शाळा चौथी पर्यंत २५ पटसंख्येची होती . गुरुजी आपल्या शैक्षणिक कार्यातून प्रत्येक घराघरात पोहचले . शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना निसर्गात रमवताना विविध उत्कंठावर्धक गोष्टी सांगून मुलांना ज्ञानाचे धडे दिले . गावातील सार्वजनिक कार्यक्रमांसह विविध खेळात भाग घेऊन पाध्ये गुरुजी वाडी आणि गावाजवळ एका वेगळ्या नात्याने एकरुप झाले होते . या वाडीजवळ गुरुजींचे जे नाते निर्माण झाले ते आज ३८ वर्षांनंतरही कायम आहे .
तुरळ गावामध्ये तरुण हौशी कलाकारांनी मिळून एक ” जागृती नाट्य मंडळ ” संस्था स्थापन केली होती . यावेळी पाध्ये गुरुजी यांनी मंडळाला आवश्यक ते सर्व सहकार्य केले . त्याकाळात मंडळाचे ४० सदस्य होते . दरवर्षी २६ जानेवारीला स्थानिक कलाकार नाट्यप्रयोग सादर करायचे . सलग १० वर्षे हा उपक्रम सुरु होता . जमलेल्या निधीतून मंडळाने तुरळ नं १ शाळेत रंगमंच उभा केला . १९९६ साली पाध्ये यांची तुरळ नं २ केंद्रशाळेत बदली झाली . १५० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि ६ शिक्षक अशा मोठ्या शाळेत त्यांचा प्रवास सुरु झाला . त्यावेळी सहकारी म्हणून पाच महिला शिक्षिका होत्या . या शाळेतही केंद्राची जबाबदारी , प्रामुख्याने सभा , कागदपत्रांचे एकीकरण , सुत्रसंचालन आदि कामात पाध्ये यांचा नेहमीच पुढाकार असे . केंद्र आणि हिवाळी क्रिडास्पर्धा असल्या की , विनायक पाध्ये गुरुजी हवेतच असे सुत्रच तयार झाले होते . क्रिडास्पर्धेत नेहमीच तुरळ नं . २ शाळा अग्रेसर राहिली . या शाळेत प्रथमच मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सुरु करण्यात पाध्ये यांची मोलाची कामगिरी होती . शाळेचा चांगला पट आणि ग्रामस्थांचे उत्तम सहकार्य यामुळे त्यांना हे सारे शक्य झाले . सदर शाळेत वीज जोडणी नव्हती . पाध्येंनी स्वतः पुढाकार घेऊन येथील व्यावसायिक शांतीभाई पटेल यांच्याकडून वीज जोडणीसाठी आर्थिक योगदान आणि इलेक्ट्रिक साहित्यासाठी लोकवर्गणी , देणगीदार पाहून खरेदी केले . विशेष म्हणजे शाळेतील सर्व इलेक्ट्रिक फिटींग स्वतः केले . एक कर्तव्यदक्ष शिक्षक काय करु शकतो ? त्याचे हे उत्तम उदाहरण होते .
याच काळात १५ वर्षांखालील मुलांच्या तसेच खुलागट अशा मर्यादीत षटकांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला . अनेक व्यक्ति आणि ग्रामस्थ , प्रतिष्ठीत व्यापारी या सर्वांच्या सहकार्याने बक्षिसे दिली . यावेळी सर्व जण एकत्र येवून आनंदाने गुरुजींना साथ देत होते . या शाळेतील एक हृदयद्रावक प्रसंग घडला . हा प्रसंग सांगताना आजही पाध्ये गुरुजींच्या नेत्रकडा पाणावतात . तुरळ नं . २ शाळेत असतांना एक विद्यार्थिनी शाळेत यायची बंद झाली . विद्यार्थिनी सतत गैरहजर का ? म्हणून गुरुजींनी चौकशी केली असता तिच्या आईकडून कळले , मुलीचे वडील मद्यपान करत . काही कामधंदा नाही त्यामुळे आर्थिक परिस्थिती नाही . परिणामी मुलीला शाळेत पाठवणे आईला शक्य होइना . हे ऐकून पाध्येंचे मन गहिवरले . गुरुजींनी आईला आश्वस्त केले की , यापुढे या मुलीचा सर्व शैक्षणिक खर्च मी स्वतः करेन , तुम्ही उद्यापासून मुलीला शाळेत पाठवा . दुसऱ्या दिवसापासून मुलगी नियमित शाळेत येवू लागली . पुढे ती खूप शिकली आज तिचा विवाह होवून ती शिक्षणामुळे स्वतःच्या संसारात सुखी आहे . आयुष्यात एका विद्यार्थिनीच्या जीवनाला दिशा दिल्याचा सार्थ अभिमान गुरुनींना वाटत आहे .
जुलै २००२ साली पाध्ये गुरुजींची राजवाडी ब्राम्हणवाडी या शाळेत बदली झाली . येथे सतीश कामत नावाचे पत्रकार आणि पेम या सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा यांची प्रथम भेट झाली आणि त्यांच्या माध्यमातून शाळेत विविध उपक्रम राबविले गेले . विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप , छत्र्या , चपला , वह्या आदि साहित्य नियमित मिळत असे . सायंकाळी शाळा सुटताना दूध – केळी अन्य फळे इ . पौष्टिक आहार दिला जायचा . यावेळी शैक्षणिक सहल , विविध गुणदर्शन कार्यक्रम , वनभोजन , सरस्वती पूजन इ . कार्यक्रम घेण्यात पाध्ये गुरुजींचा नेहमीच पुढाकार असे . या शाळेमध्ये दिलीप कदम हा विद्यार्थी पाचवीत शिकत होता . त्याची परिस्थिती सर्वसाधारण होती . भूमिहीन शेतकरी पूत्र . या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेला बसवून वैयक्तिक मार्गदर्शन आणि दररोज जादा क्लास घेत मेहनत घेतल्याने दिलीप कदम हा गुणवत्ता यादीत आला .
विनायक पाध्ये यांची २००९ मध्ये विषयतज्ञ म्हणून पं . स . देवरुख येथे नियुक्ती करण्यात आली . त्यांनी कामगिरी म्हणून जि . प . रत्नागिरी येथे प्रतीनियुक्ती मिळावी म्हणून प्रशासनाला विनंती केली . तत्कालीन गटशिक्षणाधिकारी मोहिरे यांच्या परवानगीने आणि तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी चंद्रकांत मोहिते यांच्या सहकार्याने ‘ गुणवत्ता विकास कार्यक्रम ‘ या विभागात पाध्ये यांची नेमणूक झाली . यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी सशाली मोहिते यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले . या सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषद रत्नागिरी येथे काम करण्याची उत्तम संधी मिळाली असे पाध्ये यांनी नमूद केले . गुणवत्ता विकास विभागामध्ये अगदी प्रामाणिकपणे आणि झोकून देवून काम केले . काही वर्षांनंतर हा उपक्रमच बंद झाला . त्यामुळे पाध्ये यांना सांख्यिकी सहाय्यक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली . जे . डी . साळुंखे हे त्यावेळी शिक्षणाधिकारी होते . त्यांच्या बरोबर दोन दिवस पुणे येथे प्रशिक्षणाला जाण्याची संधी पाध्ये यांना मिळाली . या प्रशिक्षणानंतर पाध्ये यांनी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जावून मार्गदर्शन केले आणि तालुक्याची सांख्यिकी माहिती गोळा केली . यावेळी त्यांना सर्वांनीच मोलाचे सहकार्य केले . यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्याचे काम सर्वप्रथम पूर्ण झाले .
एप्रिल २०११ मध्ये पाध्ये यांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून बढती मिळाली . त्यांची नेमणूक तळेभाग संगमेश्वर येथे झाली . याशाळेत त्यावेळी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नव्हती . पाध्ये यांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून आर्थिक तरतूद करुन सहा महिन्यांच्या आत पंप , टाकी , पाईप आणून शाळेसाठी पाण्याची सोय केली . दरवर्षी शाळेत शैक्षणिक सहल , विविध गुणदर्शन कार्यक्रम , हळदीकुंकू , शारदोत्सव इ . उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित केले . चार वर्षांनंतर एका ओळखीच्या समाजसेवकाच्या सहकार्याने गोव्या मधील श्री साई संस्था मंडळाकडून शाळेसाठी बोअरवेल साठी ७० हजार रुपयांची देणगी मिळवली . मात्र दुर्दैवाने या बोअरवेलला पाणी लागले नाही . या प्रसंगाचे दु:ख पाध्ये यांना आजही वाटत आहे . या शाळेमध्ये लादी नव्हती . मुख्याध्यापक खोलीला स्वखर्चाने लादी बसवली . स्थानिक ग्रामस्थ , मुंबईकर मंडळी यांच्या सहकार्याने देणग्या गोळा करुन पूर्ण व्हरांड्याला लादी बसवून घेतली . यासाठी सर्वांचे उत्तम सहकार्य मिळाले. या तळेभाग शाळेत प्रसाद प्रमोद कांबळे हा पाचवीत शिकणारा विद्यार्थी अत्यंत हुशार होता . त्याला नवोदल विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी बसविले. स्वतः पुस्तके आणून मार्गदर्शन केले . प्रसाद या परीक्षेत उत्तीर्ण झाला . मात्र त्याचे आईवडील त्याला पडवे राजापूर येथे पाठवायला तयार होत नव्हते . पालकांची समजूत काढून त्यांना या विद्यालयाचे महत्व पटवून दिल्यानंतर पालक तयार झाले . प्रसादला स्वतःच्या गाडीने पाध्ये गुरुजींनी पडवे येथे नवोदय विद्यालयात नेले आणि सोबत त्याला खाऊ , आवश्यक साहित्य देखील घेऊन दिले . aअज प्रसाद कांबळे हा विद्यार्थी १२ वी उत्तीर्ण होवून उच्च शिक्षण घेत आहे . त्याच्या आई वडिलांना झालेल्या आनंदाचे पाध्ये गुरुजींना समाधान वाटत आहे .
शासनाने २०१७ साली उच्चश्रेणी मुख्याध्यापक हे पद रद्द पट संख्येच्या निकषांनुसार रद्द केले . या कारणामुळे पाध्ये गुरुजींना विज्ञान – गणित या विषयांचे पदवीधर शिक्षक म्हणून संगमेश्वर तालुक्यातील कडवई नं . ४ या शाळेत नेमणूक मिळाली . गणित हा विषय मूळातच पाध्ये यांच्या आवडीचा आणि या विषयात त्यांचा हातखंडा होता . शिक्षण परिषद असली की , गणिताची सोपी पध्दत , विविध क्लृप्त्या याबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असे . यावेळी पुणे येथील एका संस्थेजवळ पाध्ये गुरुजींनी संपर्क साधून तेथील ‘ अक्षर ‘ मंडळाने शाळेसाठी ३५ हजार रुपये किंमतीची ६५० पुस्तके देणगी स्वरूपात मिळवली . यातून पुढे शाळेत वाचनालय सुरु करण्यात आले . शाळेत पाध्ये यांनी आपल्या नातेवाईकांकडून निधी गोळा करुन टी व्ही , डिश , रिसीव्हर , पंखे आदि सुविधा उपलब्ध करुन दिल्या . राष्ट्रीय सणाच्या दिवशी स्वखर्चाने पाध्ये गुरुजी सर्व विद्यार्थी , पालक , पाहुणे मंडळी अशा सर्वांना जिलेबीचे वाटप करत .
सन २०२१ – २२ मध्ये जनकल्याण समिती संगमेश्वर मार्फत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . यामध्ये दप्तर , कंपास , वही , पाऊच , पेन , रुमाल , पट्टी , रंगपेटी इ . साहित्य होते . अंदाजे २० हजार रुपयांची मदत पाध्ये यांनी विद्यार्थ्यांना मिळवून दिली . यासाठी त्यांना बापट आणि काजवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले . गतवर्षी पाध्ये यांच्या आयुष्यात अत्यंत आनंदाचा क्षण आला . दिनांक १० मार्च २०२२ रोजी सेवाज्येष्ठतेनुसार ‘ शिक्षण विस्तार अधिकारी ‘ या पदावर पंचायत समिती संगमेश्वर येथे बढती मिळाली . पाध्ये यांच्याकडे कडवई प्रभागाची जबाबदारी देण्यात आली . काहीकाळ माखजन प्रभाग प्रभारी विस्तार अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. प्रथमतः त्यांनी प्रत्येक केंद्रातील शिक्षकांची सभा घेऊन , शिक्षण परिषदेमध्ये शालेय व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले . शालेय रेकॉर्ड अद्ययावत कसे ठेवावे ? वेळेचे बंधन , सर्व रजिस्टर पूर्तता कशी करावी आदि बाबी सखोल पध्दतीने शिक्षकांना समजावून सांगितल्या . शाळा भेटी करताना प्रत्येक शिक्षकाला याबाबत मार्गदर्शन करुन त्याची पूर्तता करायला सांगितली . त्यांच्या ३७ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाचा अन्य शिक्षकांना चांगलाच उपयोग झाला .
गतवर्षी इस्रो आणि नासा या परीक्षा जिल्हा परिषद रत्नागिरी तर्फे घेण्यात आल्या . या परीक्षांसाठी केंद्र आणि प्रभागातून त्यांनी अत्यंत तळमळीने काम केले . प्रभाव स्तरावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतः बक्षीस देवून प्रोत्साहीत केले . यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी आणि शाळेत जावून त्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या . यावेळी प्रभाग स्तरावर सहभाग घेतलेले आणि विजयी झालेले स्पर्धक यांना बक्षीस म्हणून वह्या देवून त्यांचे कौतूक केले . प्रत्येक शिक्षकाने आपले काम प्रामाणिकपणे आणि काळजीपूर्वक करावे , वेळेचे बंधन पाळावे , आपल्या मुलांप्रमाणेच शाळेतील विद्यार्थ्यांजवळ वागावे , समाजात मिसळावे असे पाध्ये गुरुजी नेहमीच सर्वांना सांगत आले . शाळेच्या पहिल्या दिवशी पहिलीतील विद्यार्थ्यांना अंकलिपी आणि बिस्किट पुडा भेट देण्याचा उपक्रम आपल्या नोकरीच्या काळात पाध्ये यांनी कधीही चुकवला नाही . नवी अंकलिपी पहिलीच्या मुलाच्या हातात मिळल्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर पसरणारा आनंद हेच आपले समाधान होते असे पाध्ये यांनी आवर्जून नमूद केले .
ऑगस्ट महिन्याच्या ३१ तारखेला नियत वयोमानानुसार विनायक वसंत पाध्ये हे पवित्र अशा शिक्षण सेवाव्रतातून निवृत्त होत आहेत . तरुणांनाही लाजवेल असा उत्साह , सकारात्मक वृत्ती , कर्तव्यदक्ष , समाजभान जपणारे , मुलांच्यात रमणारे , शांत स्वभाव , नम्रता , सतत कामात व्यस्त रहाण्याची आवड , समजावून सांगणे , हसतमुख आणि नेहमी आनंदी असल्याने पाध्ये गुरुजी ५८ वर्षांचे झालेत हे आजही कोणाला पटत नाही . अशा विविध गुणांमुळे पाध्ये गुरुजी तनामनाने आजही तरुणच भासतात . शिक्षण क्षेत्रातील ३९ वर्षांच्या सेवेत आपण आपल्याला विद्यार्थी , पालक , शाळा , समाज यांच्यासाठी जे काही करणे शक्य होते , ते केलेले असल्याने आज निवृत्त होताना आपण समाधानी आहोत असे त्यांनी अभिमानाने सांगितले . आपल्या चांगल्या वृत्तीमुळे परमेश्वराने आपल्याला खूप काही दिले आहे असे त्यांनी नम्रपणे सांगितले . आध्यात्मिक वृत्तीचे पाध्ये केवळ शिक्षणच नव्हे तर अन्य अनेक विषयांवर सहजपणे बोलू शकतात अशी त्यांची अभ्यासू वृत्ती आहे . सर्वांचे सहकार्य आणि श्री . गोंदवलेकर महाराज यांचे कृपाशीर्वाद यामुळे हे सारे यशस्वीपणे घडून आले असल्याचे पाध्ये हे नम्रपणे सांगतात . शिक्षण क्षेत्रातील विनायक वसंत पाध्ये या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला सेवानिवृत्ती निमित्त संगमेश्वर तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून मनापासून शुभेच्छा ! श्री . विनायक वसंत पाध्ये यांना शुभेच्छा संदेश देण्यासाठी त्यांचा 9860920630 हा भ्रमणध्वनी क्रमांक आहे .
– jdparadkar@gmail.com