[ नवी दिल्ली ]
देशातील प्रत्येक बालकासाठी शिक्षण गरजेचे आहे. शिक्षणामुळे प्रत्येक कुटुंब श्रीमंत बनेल. देशवासीयांसाठी मोफत उपचारही गरजेचे आहेत. भारताचा प्रत्येक नागरिक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. देशातील कानाकोपऱ्यात रुग्णालये आणि शाळा असणे गरजेचे आहे, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले. ‘मेक इंडिया नंबर वन’ या अभियानाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
केजरीवाल म्हणाले, देशाने गेल्या ७५ वर्षांत खूप काही मिळवले; पण लोकांमध्ये राग आहे. आपल्यानंतर स्वातंत्र्य मिळवणारी राज्ये आपल्यापेक्षा पुढे गेली. भारत मागे का राहिला, हा प्रश्न लोकांना पडतो. भारत हा जगातला एक नंबरचा देश व्हावा, हेच माझे स्वप्न आहे.
केजरीवाल म्हणाले, प्रत्येक बालकासाठी चांगल्या शिक्षणाची सोय केली पाहिजे. कुणी डॉक्टर बनेल, कुणी इंजिनिअर; पण एक बालक एका कुटुंबाला श्रीमंत बनवेल. प्रत्येक नागरिकाला चांगल्यात चांगले उपचार मोफत मिळाले पाहिजेत. प्रत्येक बेरोजगार युवकाला रोजगार दिला पाहिजे. प्रत्येक महिलेला सन्मान मिळाला पाहिजे. बरोबरीचा अधिकार, सुरक्षितता मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकरी बनू वाटत नाही. शेतकरी सुखी राहील, अशी व्यवस्था केली पाहिजे. शेतकऱ्यांना पिकांचा पूर्ण भाव दिला पाहिजे.