(रत्नागिरी/प्रातिनिधी)
6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदवले जाणे, बालकांसाठी नियमित शाळेत जाणे त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. यासाठी एकही शाळाबाह्य स्थलांतरीत बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही यादृष्टीने बालकांचा शोध घेउन त्यांना शाळेत प्रवेशित करण्यात येणार आहे. बालकांची शाळेतील गळती शून्यावर आणण्यासाठी 5 ते 20 जुलै 2022 या कालावधीत मिशन झिरो ड्रॉपआउट व्यापक स्वरुपात राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
एक महिन्यापेक्षा अधिक काळ 6 ते 14 वयोगटातील बालके शाळेत अनुपस्थित राहत असतील अशा बालकांना शाळाबाह्य बालके म्हणावे अशी व्याख्या शिक्षण अधिनियमानुसार करण्यात आली आहे.
सर्वेक्षण कसे करण्यात येते
बालकांच्या घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीटभटया, दगडखाणी, साखर कारखाने, बालमजूर तसेच स्थलांतरीत कुटुंबामधून नोंदी केल्या जातात. मागास, वंचित गटातील व अल्पसंख्यांक वस्तीतील बालकांची माहिती मिशनमध्ये घेण्यात येणार आहे
महाराष्ट्रातील सर्व खेडी, गावे, वाडी, तांडे, पाडे व शेतमळयात, जंगलात वास्तव्य करणार्या पालकांच्या शाळाबाह्य बालकांचा सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात येणार आहे.