(नाशिक)
गोखले शिक्षण संस्थेचे सचिव, महासंचालक आणि शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी यांचे रविवारी पहाटे वयाच्या 88 वर्षी निधन झाले. गोसावी ‘टीचर ऑफ द मिलेनियम म्हणून ओळखले जात होते. त्यांचे पार्थिव भियक्ष महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रध्दांजली अर्पण केली. शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून गोसावी यांची ओळख होती.
पुण्याच्या बी. एम. सी. सी. महाविद्यालयातून 1958 साली पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आयएएस उत्तीर्ण केल्यानंतर प्रसासकीय सेवेची निवड न करता शिक्षण क्षेत्राची निवड केली. या क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला. त्यांची वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील आदर्श शिक्षकाची भूमिका सर्वांना प्रभावित करणारी होती. सर्वात कमी वयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची आजही नोंद कायम आहे. गोसावी यांचा श्रीमद्भगवद्गीतावर नितांत श्रद्धा आणि प्रचंड असा अभ्यास होता. शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले की, ‘गोसावी मुळचे पैठणचे आहेत. असे असले तरी त्यांनी नाशिक हे आपले कार्यक्षेत्र मानले. त्यांनी उभे आयुष्य इथे घालवले. गोखले एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळीतील महत्त्वाची संस्था आहे. त्याचं काम मुंबई, पालघर आणि नाशिकमध्ये आहे. दर्जेदार शिक्षण देण्यात त्यांचा लौकिक होता. त्यांचे स्मरण शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर विविध क्षेत्रात अखंड राहील याचा मला विश्वास आहे.