शासनाने शिक्षकांना सुट्टी जाहीर करूनही रत्नागिरी माध्यमिक शिक्षण विभागाने मात्र अजूनही त्याची दखल घेतली नाही असेच म्हणावे लागेल. मे महिना सुरू होऊन आठ दिवस झाले तरी रत्नागिरी जिल्ह्याच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधी संदर्भात शिक्षणाधिकारी यांनी कोणतीही लेखी सूचना शाळांना अद्याप पाठवली नाही.
सर्वच शिक्षकांना कोवीड ड्युटी लागल्या आहेत. प्रामाणिकपणे शिक्षक नेमून दिलेल्या ठिकाणी कार्यरत आहेत. पण एक गोष्ट निदर्शनास अशी येते की, पंचायत समिती कडून ड्युटी लावण्याचे नियोजन व्यवस्थित केले जात नाही. काही शिक्षकांना 6 तास तर काहीना बारा तास काम करावे लागत आहे .बऱ्याच ठिकाणी रात्रीच्या ड्युटी साठी फक्त शिक्षकांनाच ड्युटी लावली जात आहे. आपल्या जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे .पंढरपुरातील ड्युटीवर असणाऱ्या शिक्षकांसह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास याबाबत प्रशासनाची भूमिका काय असेल हे विचारण्यासाठी शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते उद्या सकाळी 11 वाजता शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.
रत्नागिरी माध्यमिक विभाग कडून सुट्टीच्या कालावधी संदर्भात कोणतीही लेखी सूचना शाळांना अद्याप प्राप्त नाही. शिक्षकांना लावल्या जाणाऱ्या ड्युटीबाबत नियोजनाचा अभाव आहे. सरसकट सर्वच शिक्षकांना ड्युटी तसेच इतर विभागातील कर्मचारी अकरा ते पाच या वेळेत तर रात्रीच्या ड्युटी साठी फक्त शिक्षकांचीच नियुक्ती, आठवी ते दहावी अध्यापनाचे काम ऑफलाइन आणि ऑनलाइन करणाऱ्या शिक्षकांना सुट्टीच्या कालावधीत ही ड्युटी, ऑनलाईन तास, परीक्षा, पेपर तपासणी ,निकाल, पुढील वर्षाचे नियोजन या कामांमध्ये सुट्टी जाहीर झाली असली तरी शिक्षक काम करतोच आहे. यासाठी सुट्टी कालावधीतील ड्युटीची परिवर्तित रजा मिळण्याबाबत विचार करावा अशा शिक्षकांच्या प्रमुख मागण्या आहेत .
याबाबत योग्य असा निर्णय घेणेत यावा यासाठी शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते शिक्षणाधिकारी यांना विनंती करण्यासाठी कार्यालयात धडकणार आहेत असे शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष रविंद्र इनामदार , रत्नागिरी जिल्हा जिल्हाध्यक्ष एस . एस .पाटील, रत्नागिरी जिल्हा सचिव पी . एम . पाटील यांनी कळविले आहे.