(मुंबई)
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक होत असून, यासाठी आज सोमवार, दि. ३० जानेवारी रोजी मतदान होत आहे. पाचही जागांवर सत्ताधारी भाजपचे पाठबळ असलेले उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यात चुरशीची लढत होत आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातदेखील राष्ट्रवादीचे विक्रम काळे चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे किरण पाटील मैदानात आहेत. याशिवाय नाशिक, नागपूर, अमरावती आणि कोकणातही चुरस कायम आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता ऐनवेळी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांना पाठिंबा नाकारला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अपक्ष शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे या जागेवरील लढतीबाबत उत्सुकता वाढली आहे. यासोबतच अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे डॉ. रणजित पाटील आणि काँग्रेसकडून धीरज लिंगाडे आमनेसामने आहेत.
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षक भारतीचे धनाजी पाटील, शेकाप व महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार बाळाराम पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत, तर नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांच्यात तिरंगी लढत होत आहे. दोन्ही बाजूंनी ताकद लावण्यात आल्याने कोण बाजी मारणार, याकडे लक्ष असणार आहे. राज्यातील पाचही जागांची मुदत ७ फेब्रुवारी रोजी संपत आहे. या निवडणुकीसाठी आज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.