(मुंबई)
महाराष्ट्रात सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. परंतु अजूनही एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून आता विरोधी पक्ष सातत्याने त्यांच्यावर टिका करीत आहेत. भाजप आणि शिंदे गटात नाराजी असून आमदार पळून जाण्याच्या भीतीने मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याचा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला.
राज्यातील भाजप आणि शिंदे सरकारला लोकांचं काहीच घेणं देणं नाही. कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडली आहे. अहमदनगरला औरंगजेबाचे फोटो दाखवले जातात. केवळ शब्दांचा मारा उपमुख्यमंत्री करतात, बाकी काहीच करीत नाही. संभाजीनगरलाही असंच झालं, पुन्हा तेच चित्र पाहायला मिळंतय हे दुर्दैवी आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. ५०-५० चा फॉर्म्युला केला गेला आहे. पंरतु भाजप आणि शिंदे गटात प्रचंड नाराजी आहे. ज्यांना पद मिळणार नाही ते पळून जातील या भीतीने कॅबिनेट विस्तार केला जात नाही आहे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी भाजप आणि शिंदें गटाला टोला हाणला आहे. तसेच पडळकर यांना कोण विचारतंय. तर सुधीर मुनगंटीवार सारख्या नेत्यांने शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करणं हे मंत्री पदाला शोभणारं नाही. असंही ते म्हणाले.