(मुंबई)
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्रातील दिग्गज राजकारणी एकाच मंचावर आले होते. आशिष शेलार आणि शरद पवार यांच्या पॅनलच्या बैठकीच्या निमित्ताने राजकीय विरोधक एकाच मंचावर आलेले दिसून आले. मंचावर एकनाथ शिंदे यांच्या बाजूला शरद पवार तर देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला जितेंद्र आव्हाड बसल्याचे दिसून आले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक आज होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या स्रेहभोजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद नार्वेकर एकत्र आलेले पाहायला मिळाले. गेल्या चार महिन्यातील राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच हे नेते एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांनी संयुक्त पॅनल उभे केले आहे, तर यांच्या विरोधात क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे पॅनल निवडणूक लढवत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ मित्र असतानाही काळे कायम पडद्यामागे राहणे पसंत करतात. नागपूरकर असलेले काळे हे मागील काही वर्षांपासून संघटनेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी काळे आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व १९८३ च्या विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य संदीप पाटील यांच्यात निवडणूक होणार आहे.