(मुंबई)
बाळासाहेबांची शिवसेना व भाजपमधील अंतर्गत धूसफूस ठाण्यात चव्हाट्यावर आली आहे. राज्यातील सत्ताधारी शिंदे गट व भाजपमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. पोस्टर लावण्याच्या वादातून वागळे इस्टेट येथे भाजप पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हा हल्ला शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने केल्याचा आरोप ठाणे भाजपकडून करण्यात येत आहे. याबाबतचे ट्विटही ठाणे भाजपच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील परबवाडी भागात भाजपाच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकारानंतर ठाण्यात दोन्ही पक्षांमधील अंतर्गत धूसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असल्याची चर्चा आहे. हल्ल्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक झाले असून सोशल माध्यमातून याचा निषेध केला जात आहे. “हीच का बाळासाहेबांची शिकवण?” असे संदेश भाजपाकडून प्रसारित केले जात आहेत. तसेच भाजपाच्या महिला मोर्चानेही “दोस्ती को दोस्ती.. मार को मार.. लहू को लहू से जवाब” असा संदेश ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील परबवाडी परिसरात गुरुवारी पोस्टर लावण्याच्या कारणावरून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपाचे प्रशांत जाधव यांच्यात वाद झाला. भाजपाचे पदाधिकारी प्रशांत जाधव हे याच परिसरात राहतात. या वादानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना समज दिली होता. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी उशिरा अचानक १५ ते २० जणांच्या जमावाने प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जाधव यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर ठाणे जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर ठाण्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांनी केल्याचा आरोप केला आहे. त्यांसदर्भात ‘भाजप ठाणे’ या खात्यावरून ट्वीटही करण्यात आले आहे.