(मुंबई)
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे गट व भाजपच्या काही आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्लीत जाऊन आले. यानंतर शिंदे गटाच्या ५ मंत्र्यांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांना बदलण्याची सूचना देण्यात आली होती, अशी माहिती मिळत आहे. गोपनीय अहवालाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र, संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत यांच्यासह पाचही मत्र्यांनी हे आक्षेप फेटाळले आहेत.
यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी असा अहवाल भाजपने दिलेला नाही. विस्तार रखडल्याने ना मुख्यमंत्री नाराज आहेत, ना युतीत वाद आहेत. काही नेते १५-१५ दिवस लंडनला विश्रांतीसाठी जातात. मग १८ तास काम करणारे मुख्यमंत्री आपल्या परिवाराला तीन दिवस देऊ शकत नाही का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मंत्री तानाजी सावंत यांनीही माझ्यावरील आरोप खोटे आहेत. कोरोना काळात आम्ही शेवटच्या माणसापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवल्या. कोणत्याही व्यवहारासाठी कुणाची नेमणूक केली नाही. जे खासगी सचिव, ओएसडी नेमले ते आरोग्य विभागाचे कामकाज चांगले व्हावे म्हणूनच नेमले, असा लेखी खुलासा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला. तर यासंदर्भात शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्याचे नियोजन सध्या चालू आहे. पण नेमकी तारीख सांगता येणार नाही. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या नव्या चेह-यांनाही संधी दिली जाणार आहे. मात्र ते कोण नवे चेहरे असतील, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील.