(नाशिक)
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा काल सहावा दिवस होता. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. तहसिलदार यांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. आमदार-खासदार यांना घेराव घालण्यात येत आहे.
तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर काल बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनीही राजीनामा दिला आहे. तर त्यानंतर आता शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा पक्षाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे.
दरम्यान, खासदार हेमंत गोडसे यांनी काल नाशिक शहरातील शिवस्मारकावर सुरु असलेल्या उपोषण स्थळावर भेट दिली होती. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घालत राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर काही वेळातच खासदार हेमंत गोडसे यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल झाले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर आपला राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. लवकरात लवकर मराठा बांधवाना आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी राजीनाम्याद्वारे केली आहे. कोणत्याही खासदाराचा राजीनामा हा लोकसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सचिवालयकडे द्यायचा असतो, मात्र हेमंत गोडसे यांनी पक्षाचे प्रमुख म्ह्णून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिला आहे.
राजीनामा पत्रात काय म्हंटले आहे?
आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाच्या भावनांचा होणारा उद्रेक पाहून मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देत आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन मराठा समाज आरक्षणासाठी झटत आहे. आरक्षण नसल्याने शिक्षण आणि नोकन्या मिळणेकामी मराठा समाजातील मुलांची मोठी कुचंबना होत आहे. मागील आठवड्यापासून पुन्हा आरपारच्या लढाईसाठी समाजातील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. यामुळे राज्यभरातील तमाम मराठा समाजामध्ये आता आरक्षण मिळालेच पाहिजे, आता नाही तर कधीच नाही अशी तीव्र भावना निर्माण झाली आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असल्याने मराठा समाजाच्या भावनांचा आता राज्यभर उद्रेक होऊ लागला आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना विचारात घेऊन मी आपल्या पक्षाचा लोकसभा सदस्य असल्यामुळे माझ्या खासदारकीचा राजीनामा आपणांकडे सादर करीत असल्याचे पत्रात म्हटले आहे.