बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. यावर्षी ‘जवान’ आणि ‘पठान’ अशा लागोपाठ दोन हिट चित्रपटानंतर शाहरूखला असलेला धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. शाहरुख खानच्या ‘पठान’ या चित्रपटावरून अजूनही काही वाद सुरूच आहेत. या वादांमुळे शाहरुख खान याला सतत धमक्या मिळत आहेत. याच कारणामुळे आता त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. यात किंग खानला नेहमीच सहा पोलीस कमांडो त्याचे बॉडीगार्ड म्हणून मिळतील. सशस्त्र अंगरक्षक महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष संरक्षण युनिटचे असतील. जवानने भारतात 618.83 कोटी रुपये आणि जागतिक स्तरावर 1,103 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर पठाणने भारतात 543.05 कोटी रुपये आणि जगभरात बॉक्स ऑफिसवर 1,050.3 कोटी रुपये कमावले आहेत.
संपूर्ण भारतामध्ये त्याला सुरक्षा दिली जाईल आणि ते बॉडीगार्ड MP-5 मशीन गन, AK-47 असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्तूल घेऊन सज्ज असतील. अभिनेत्याच्या निवासस्थानावर सदैव चार सशस्त्र पोलिसांचा पहारा असेल. अभिनेता त्याच्या सुरक्षेसाठी पैसे देईल. भारतात खाजगी सुरक्षा अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज नाही, म्हणूनच पोलीस सुरक्षा घेतली जाते. गुप्तचर अहवालात म्हटलं आहे, की शाहरूखच्या दोन चित्रपटांच्या यशामुळे त्याच्या जीवाला धोका वाढला आहे.
दिलीप सावंत, विशेष आयजीपी (व्हीआयपी सुरक्षा) यांनी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये असं म्हटलं आहे की: “सिने अभिनेता शाहरुख खानला अलीकडील संभाव्य धोके लक्षात घेता, सर्व युनिट कमांडरना विनंती केली जाते की त्याला पेमेंट आधारावर Y+ एस्कॉर्ट स्केल सुरक्षा प्रदान करावी. पुढील उच्च स्तरीय समितीच्या शिफारशी आणि पुनरावलोकन समितीच्या निर्णयापर्यंत कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी तात्काळ प्रभावाने शाहरूखला ही सुरक्षा पुरवा.”
शाहरुख खानला याआधी दोन पोलीस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्याशिवाय त्याच्यासोबत स्वत:चा सुरक्षा रक्षकही असायचा. मात्र आता उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनंतर शाहरुख खानची सुरक्षा Y+ स्कोअरवर अपग्रेड करण्यात आली आहे.
शाहरुख खान आता राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटच्या सहा प्रशिक्षित कमांडोच्या टीमसोबत नेहमीच असेल. जे एमपी गन, एके-47 असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्तुलने सुसज्ज असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या सुरक्षेशिवाय त्याच्या घरावर चोवीस तास शस्त्रांसह मुंबई पोलिसांचे चार कर्मचारी पहारा देतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान कारने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल, त्यावेळी त्याच्या सुपक्षेखाली प्रशिक्षित कमांडो तसेच ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन असेल. ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनामुळे शाहरुखच्या गाडीसमोर कोणीलाही येता येणार नाही. वाहतूक सुरळीत करण्यास हे वाहन मदत करेल.