(मुंबई)
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 30 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी ईडीने गौरी खानला नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण लखनऊच्या एका प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे, या कंपनीने गुंतवणूकदार आणि बँकांचे अंदाजे 30 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. गौरी खानही या कंपनीशी संबंधित होती.
मात्र, या संपूर्ण प्रकरणावर गौरी खानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ‘तुलसियानी ग्रुप’ असे या रिअल इस्टेट कंपनीचे नाव असून गौरी खान ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून संबंधित आहे. बँकेसोबतच गुंतवणूकदारांनीही या रिअल इस्टेट कंपनीवर करोडोंची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी बऱ्याच दिवसांपासून चौकशी सुरू होती आणि आता गौरी खानही ईडीच्या रडारवर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडी गौरी खानची कंपनीसोबतच्या कराराबद्दल चौकशी करेल आणि तिला व्यवहार आणि फी पेमेंटशी संबंधित तपशील देखील द्यावा लागेल, अशी माहिती आहे.
मुंबईतील एका व्यक्तीने 2015 मध्ये लखनऊमधील तुलसियानी ग्रुपच्या सुशांत गोल्फ सिटीमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटची किंमत 85 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. गुंतवणुकदाराने संपूर्ण पैसे भरले होते परंतु अद्याप ताबा देण्यात आलेला नाही किंवा त्याचे पैसेही परत केलेले नाहीत. त्यानंतर फ्लॅट खरेदी करणाऱ्या व्यक्तीने ग्रुप डायरेक्टर अनिल कुमार तुलसियानी आणि महेश तुलसियानी तसेच गौरी खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गौरी खान या प्रोजेक्टला एंडोर्स करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
गौरी खान या प्रोजेक्टची जाहिरात करत होती म्हणून हा फ्लॅट खरेदी केला असल्याचे किरीट जसवंत शहाने तक्रारीत सांगितले आहे. या चौकशीत गौरी दोषी आहे की नाही?, ब्रँड ॲम्बेसेडर होण्यासाठी किती पैसे घेतले?, किरीट शहाचे ८५ लाख रूपये कोठे गेले? यासारख्या अनेक प्रश्नाची चौकशी करण्यात येणार आहे.