(राजापूर/प्रतिनिधी)
नळपाणी योजना पूर्ण न होताच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी ग्रामपंचायतीला माहिती न देता परस्पर ठेकेदाराला बिल अदा केल्याने या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे लेखी निवेदन कोंढेतड ग्रामपंचायतीच्यावतीने गुरूवारी आ. राजन साळवी तसेच गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.
चार वर्षांपूर्वीच्या या योजनेची तत्काळ सखोल चौकशी करून संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच योजनेचे काम तत्काळ सुरू करून घरोघरी पाणी पुरवठा चालू व्हावा. तसे न झाल्यास सरपंच व ग्रामस्थ दोन ऑक्टोबर रोजी पंचायत समितीसमोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
काँडेतर्फे राजापूर ( कोंढेतड) ग्रामपंचायत अंतर्गत तब्बल ३६ लाख रूपये खर्चाची राष्ट्रीय नळपाणी योजना पूर्ण न होताच ग्रामीण पुरवठा उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी ग्रामपंचायतीला माहिती न देता ठेकेदाराला बिल अदा केले. ग्रामीण पाणी पुरवठा राजापूर उपअभियंता यांना अनेक वेळा सरपंच यांच्याकडून घरोघरी पाणी पुरवठा सुरू झाल्याखेरीज ठेकेदाराला बिल अदा करू नये, असा पत्रव्यवहार करून देखील ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी ग्रामपंचायतीला कोणतीही कल्पना न देता नळपाणी योजनेच्या ठेकेदाराला परस्पर बिल अदा केले.
ठेकेदार अथवा अधिकान्यांनी ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याची गरज असताना तसे करण्याचे टाळून ठेकेदाराचे बिल मात्र अदा केले गेले. मात्र संपूर्ण गावाच्या या नळपाणी योजनेतील त्रुटी अपूर्ण असून व झालेले काम हे निकृष्ठ दर्जाचे असून सद्या नळयोजना सुरू होण्यापूर्वीच बंद अवस्थेत आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून या योजनेचे काम सुरू झालेले होते. परंतु आजपर्यंत संपूर्ण कोंढेतड ग्रामपंचायत अंतर्गत घरोघरी ३६ लाख रूपये योजनेचे ३६ लिटर पाणीदेखील एक दिवसही गावात पोचलेले नाही. याबाबत ग्रामस्थांनी आता आक्रमक होऊन पंचायत समिती येथे जाऊन जाब विचारला.