(चिपळूण)
शासकीय योजना तर अनेक आहेत, परंतू त्या गोरगरीबांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रीय यंत्रणा आवश्यक असते. अशी यंत्रणा निर्माण करून तशी सेवा घेऊन जाणारे “आरोग्यदूत” शशिकांत चव्हाण यांच्या सारखे फार दुर्मिळ आहेत.
तब्बल दोन नव्हे तीन नव्हे तर मागील तब्बल 42 वर्षापासून जन्मजात बोलता व ऐकायला न येणार्या कापसाल डिगेवाडी येथील श्रीमती संध्या ठसाळे या कठीण जीवन जगत होत्या. त्यांची ही परिस्थिती गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री कृष्णा डीगे व प्रथितयश बिल्डर श्री रमेश चव्हाण यांनी श्री शशिकांत चव्हाण यांच्या लक्षात आणून दिली.
श्री शशिकांत चव्हाण यांनी वेळ देऊन त्यांना रत्नागिरी येथे नेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संघमित्रा फुले मॅडम यांची भेट घेतली. श्रीमती संध्या ठसाले यांची शारीरिक तपासणी करून त्यांना नव्वद टक्के अपंगत्वाचे सर्टीफिकेट दिले. यामुळे आज उशिरा का होईना परंतू बेचाळीस वर्षानंतर मिळालेल्या दाखल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे व त्यामुळे त्यांना अनेक अडचणींवर मात करण्यास मदत होणार आहे.
श्री शशिकांत चव्हाण हे अनेक दिनदुबळ्या, गरीब व आर्थिकदृष्टय़ा कमजोर असलेल्या, अनेक प्रकारच्या आजाराने त्रस्त असलेल्या अनेकांना मदतीचा हात देण्याचे काम करीत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.