(रत्नागिरी/प्रतिनिधी)
विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत प्रकृती सुधारेपर्यंत क्षयरूग्णांना दत्तक घेणार आहेत. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरूग्णांच्या खात्यावर दरमहा ५०० रुपये जमा केले जातात. सदरची मदत अत्यंत अल्प असून अन्न पुरवठा, इतर सुविधा, सहकार्य करणे आवश्यक आहे. क्षयरूग्णांची प्रकृती सुधारून ते तत्परतेने पूर्ववत होण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाणार आहे.
केंद्रीय स्तरावर निक्षय मित्र होऊन क्षयरूग्णांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व खाजगी औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी जास्तीत जास्त प्रमाणात निक्षय मित्र व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. वसिम सय्यद यांनी रत्नागिरी तालुक्यातील काही क्षयरूग्णांना दत्तक घेतले आहे. सदर अधिकाऱ्यांमार्फत क्षयरूग्णांवर उपचार सुरू असेपर्यंत पोषण आहार पुरवला जाणार आहे.
सर्व अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था यांना निक्षय मित्र होऊन क्षयरूग्णांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. निक्षय मित्र संबंधित अधिक माहितीसाठी जिल्हा क्षयरोग केंद्रातील दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२८४० यावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी केले आहे.