(मुंबई)
शाळेत प्रवेश घेताना आता विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचं आधार कार्ड देखील लिंक केलं जाणार आहे. बनावट पटसंख्या दाखवून अनेक शाळा कोटय़वधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटत असल्याचे प्रकार उजेडात आल्यानंतर आता यापुढे शाळा प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांनाही आधारसक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला आहे. बनावट विद्यार्थी पटसंख्या दाखवून सरकारी अनुदान पदरात पाडून घेणाऱ्या शाळांवर अकुंश आणण्यासाठी तसेच शाळा प्रवेशामध्ये होणाऱ्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांवरच आता प्रवेश देखरेख समितीची जबादारी सोपविण्यात आली आहे. तसेच ही समिती यापुढे शाळेतील प्रवेश प्रक्रियेवर देखरेख आणि नियंत्रण ठेवील.
काय आहेत शाळा प्रवेशाबाबतच्या नवीन मार्गदर्शक सूचना
- विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डसोबत जोडण्यात यावेत.
- प्रवेश अर्जासोबत पालकांचे सुद्धा आधार कार्ड सादर करण्यात यावे
- शाळा व्यवस्थापन समिती ही प्रवेश देखरेख समिती म्हणून काम करेल
- विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना शाळांनी पालकांकडून दोन प्रतीमध्ये प्रवेश अर्ज भरून घ्यावा. प्रवेश अर्जावर पालकांची स्वाक्षरी असावी.
- प्रवेश अर्जावर पालक आणि विद्यार्थ्यांचे फोटो लावलेले असावेत.
- प्रवेश अर्जाची एक प्रत केंद्र प्रमुखास देण्यात यावी. तर एक प्रत शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात यावी.
- शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनी वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पटपडताळणी पार पाडावी
- प्रवेश प्रक्रियेत दुरुपयोग आढळून आल्यास संबंधित पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करावा
- काही कारणांमुळे पालक आधारकार्ड सादर करू शकले नाही, तर अशा प्रकरणांमध्ये पालकांचे आधारकार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा.
- अनियमितता आढळून आलेल्या शैक्षणिक संस्थांचे अनुदान परत घेण्याबाबत किंवा अनुदान थांबवण्याबाबत तसेच शाळेची मान्यता काढून घेण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांनी संचालकांमार्फत तत्काळ शासनास सादर केला जाणार आहे. शाळांनी प्रत्येक महिन्याच्या शेवटी हजेरी पटाच्या प्रती शिक्षण यंत्रणेला सादर करावयाच्या आहेत