( खेड / भरत निकम )
तालुक्यातील गुणदे येथील अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठानच्यावतीने तालुक्यातील विविध वृत्तपत्रातील पत्रकारांचा ‘पत्रकार भुषण २०२३’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान व सरस्वती शिक्षण संस्था गुणदे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानसाधना सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘आपलं कोकण’चे नंदेश खेडेकर व मार्तंड कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विक्रांत आंब्रे, उपाध्यक्ष अरविंद आंब्रे, माजी अध्यक्ष भास्कर आंब्रे, संचालक संजय आंब्रे, विलास आंब्रे, सचिव सुभाष पवार, सहसचिव राजेंद्र आंब्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर बाळकृष्ण आंब्रे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात सुरूवातीला संस्थाध्यक्ष विक्रांत आंबे यांनी मनोगत व्यक्त केले. तर मुख्याध्यापिका अश्विनी जोशी यांनी प्रास्तविक करुन सदगुरु काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे या प्रशालेतुन माध्यमिक शालांत परिक्षा मार्च २०२३ मधुन विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या आदित्य सुनिल आंब्रे (प्रथम), श्रावणी पांडुरंग आंब्रे (द्वितीय), सानिया विनोद आंब्रे (तृतीय), तनिक्षा प्रसाद साळवी (चतुर्थ), भुमिका विजय शिर्के (पंचम) या विद्यार्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अपूर्व प्रभाकर भांबीड याचा होतकरु विद्यार्थी म्हणुन शालेय कायम ठेवीवरील व्याजातुन रोख बक्षीस देऊन पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.
सदगुरु काडसिद्धेश्वर विद्यालयातुन अनुक्रमे आदित्य सुनिल आंब्रे व तनिक्षा प्रसाद साळवी या विद्यार्थ्यांना व गुरुकुल विद्यामंदीर गुणदे या प्रशालेतील अनुक्रमे ओम बबन बारे, शुभ्रा विनोद साळुंखे या विद्यार्थाना अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान न्यासातर्फे उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नंदाताई-सुधाताई स्मृती गुणवंत विद्यार्थी पुरस्कार २०२३ देऊन पालकांसमवेत गौरविण्यात आले. यावेळी ‘माझं कोकण’ चॅनेलचे नंदेश खेडेकर, पत्रकार सुनिल आंब्रे, संतोष आंब्रे यांचा ‘अनुदत्त पत्रकार भुषण २०२३’ सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना नंदेश खेडेकर यांनी संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून संस्थेचे चाललेले कार्य इतर शैक्षणिक संस्थांसाठी आदर्शवत आहे, असे सांगितले. तर मार्तंड कुलकर्णी यांनी सातत्यपूर्वक नवोपक्रम यामुळे संस्था ग्रामीण भागातील आदर्श संस्था म्हणुन नावलौकिक मिळवित आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर आंब्रे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेच्या प्रगतीचा आलेख सांगितला. संचालकांची एकजुट आणि निश्चित ध्येय असेल तर ग्रामीण भागातही प्रगत असे विद्येचे दालन उभे राहु शकते असे सांगितले.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद आंब्रे, सचिव सुभाष पवार, सहसचिव राजेंद्र आंब्रे, तसेच संजय आंब्रे, सुनिल मोरे, अविनाश आंब्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक नारायण देवकर, उमेश कराडकर, अमोल साळुंखे, मुख्याध्यापिका सौ. अनिता विचारे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.