(मुंबई)
देशामध्ये काही धर्मांध आणि जातीय शक्ती सांप्रदायिक धृवीकरण करीत देशाची एकता आणि अखंडता संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करीत सामान्य जनतेमध्ये भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्मिती केली जात आहे. विशिष्ट एका समुदायाच्या लोकांच्या संपत्ती आणि घरादारावर न्यायालयाचा निर्णय न घेता, बुलडोझर चालवले जात आहेत. निवडणूक आयोग सीबीआय, आय.बी. अशा संस्था संशयास्पद भूमिका बजावत आहेत. लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, कोविड जिहाद असे शब्द जाणिवपूर्वक वापरून एक समाजाला टार्गेट करून सरकारी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू, डॉ बाबासाहेब आंबेडकर, फातिमा शेख, संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, न्यायमूर्ती रानडे, नामदार गोखले, प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्राला पूरोगामी प्रेरणा दिली. यांचे विचार संपवले जात असून धार्मिक द्वेष मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहे.
महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा दिग्गज नेत्यांच्या संघर्षामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून निर्माण केलेली लोकशाही यंत्रणा व संस्था उध्वस्त केल्या जात आहेत. संविधानावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करीत त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भारतातील अल्पसंख्यांक मुस्लिम,ख्रिश्चन वमागासवर्गीय समाजावर होणार्या अत्याचारावर शासन आणि प्रशासनाकडून निष्क्रियता दर्शवली जात आहे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवून धार्मिक सलोखा व सद्भावना निर्माण करणे अत्यावश्यक आहे.
सध्या परिस्थितीची गरज म्हणून सर्व भारतीय संविधान प्रेमी धर्मनिरपेक्ष विचाराच्या व्यक्तीं व संस्थाची एकत्र मोट बांधण्यासाठी व एकत्र कृतिशील कार्यक्रम ठरविण्यासाठी राज्यातील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांची व्यापक बैठक शनिवार, दि. १८ मार्च,२०२३रोजी सकाळी ठीक १०-३० ते ५-००या वेळेत ईस्लाम जिमखाना, मरीन लाईन, मुंबई येथे विचार मंथन आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत राज्यातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तरी महाराष्ट्रातील विचारवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार युसूफ अब्राहनी, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, नितीन वैद्य आदींनी केले आहे.