(खेड)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे संस्थापक शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट २०२२ रोजी ९ वर्षे पूर्ण होत असून,अद्यापही त्यांच्या मारेकऱ्यांना मुख्य सुत्रधारांना पकड़ता आले नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात तरी शासनाने ठोस निर्णय घेऊन या हत्येच्या तपासाची गती वाढवावी, अशी मागणी खेड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या वतीने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे पत्र खेड तहसीलदार प्राजक्ता घोरपडे मॅडम व खेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना देण्यात आले.
यावेळी अंनिसने जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर, खेड शाखा कार्याध्यक्ष सचिन शिर्के, राजपाल भिडे, भरत पवार उपस्थित होते. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. समाजसुधारकांना जाणिवपूर्वक संपवण्यात येत आहे. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अपेक्षित गतीने न झाल्याने पुढील हत्यांची मालिका झाली. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून अनिष्ट आणि अघोरी प्रथा-परंपरापासून सुटका करणाऱ्या व्यक्तीची हत्या होणे, हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. या समाजसुधारकांच्या हत्यारांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना शिक्षा व्हावी, अशी ही मागणी करण्यात येत आहे.