(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आला आहे. या अहवालानुसार तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने तणावाखाली आत्महत्या केल्याचा संशय असून, त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. नीलिमा २९ जुलै रोजी ओमळी गावी जाण्यासाठी निघाली. मात्र, १ ऑगस्ट रोजी दाभोळ खाडीत तिचा मृतदेह आढळला. तिच्या डोक्यावरचे केस गेल्याने घातपाताचा संशय होता.
नीलिमा चव्हाणच्या मृत्यू घटनेच्या निषेधार्थ नाभिक समाजाने एक दिवस १५ ऑगस्ट रोजी काळ्याफिती लावून आंदोलन केले. पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेत हा सगळा प्रकार आता सीआयडी कडेच वर्ग करा अशी मोठी मागणी करण्यात आली आहे. चिपळूण तालुका महिला फोरमकडूनही खासदार विनायक राऊत व खासदार सुनील तटकरे यांच्याकडे या सगळ्या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला. ती गेलेल्या मार्गावरचे सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले होते. या तपासात ती भरणे नाका येथे उतरून पायवाटेने गेल्याचे समोर आले. तिच्या व्हिसेरा अहवालात शरीरात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले. तिचा शवविच्छेदन अहवालही आता प्राप्त झाला आहे. त्यात तिचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने तणावाखाली आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिने मित्रांशी केलेला व्हॉटसअप चॅट पोलिसांना मिळाला आहे. आता पोलिस त्यादृष्टीने तपास करत असल्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.