पुण्यात गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड गणेश मारणेला अटक करण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत संगमनेर येथून त्याला अटक केली आहे. पोलिसांना बघून पळ काढणाऱ्या मारणेला पोलिसांनी थरारक पाठलाग करत पकडले. त्याच्यासह तीन जणांना पुणे पोलिसांनी बुधवारी उशिरा पकडले.
गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलिसांकडून शरद मोहेळ हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांवर मोक्का लावला आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या घराजवळच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेने पुण्यासह राज्यात खळबळ उडाली होती.
शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर काही तासांतच सात जणांना अटक केली होती. त्यानंतर १५ जानेवारी रोजी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली. दरम्यान, याआधी गणेश मारणेने अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळला होता. सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं. त्यानंतर तो फरार होता.
शरद मोहोळ हत्येप्रकरणी पोलीसानी आतापर्यंत 24 जणांन अटक केली आहे. यामध्ये साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय वटकर, आदित्य गोळे, संतोष कुरपे, नामदेव कानगुडे, अमित ऊर्फ अमर कानगुडे, सतीश शेडगे, नितीन खैरे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर यांचा समावेश आहे.
शरद मोहोळ याची हत्या करण्यापूर्वी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांची एक महिना आधी बैठक झाली होती. याचवेळी मोहोळ याची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, मुख्य आरोपी गणेश मारणे हा फरार असल्याने पोल्कीसांचा पुढील तपास काही काळ मंदावल होता. परंतु, आता गणेश मारणे पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.