खंडाळा : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती आणि विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारे स्वर्गीय शरद दादा बोरकर यांचे कार्य आम्हा सर्वांनाच सदैव प्रेरणादायी व मार्गदर्शन करणारे असेल असे मत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती शरद चव्हाण यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती शरद बोरकर यांच्या दुःखद निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत बोलत होते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे ह. भ. प. शरद दादा बोरकर यांचे दुःखद निधन झाले. त्या अनुषंगाने शिवसेना वाटद जिल्हा परिषद गटाच्या वतीने या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शरद चव्हाण म्हणाले की, माझ्यासारख्या असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देऊन सामाजिक क्षेत्रात आणण्यात दादा बोरकर यांनी केले. गावागावात अनेक कार्यकर्ते दादा बोरकर यांनी उभारत विकासाची कामे करण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच आजही त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या की सर्वांनाच गहिवरून येते अशी भावना व्यक्त केली.
तसेच यावेळी उपस्थित असणारे जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी उपतालुकाप्रमुख प्रकाश साळवी यांनीही शरद दादा बोरकर यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आणि आठवणी सांगून सर्वच शिवसैनिकांनी दादा बोरकर यांच्या अपेक्षेप्रमाणे सामाजिक कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी अनिकेत सुर्वे, अप्पा धनावडे, रामचंद्र सावंत, शत्रुघ्न लंबे, राजेश जाधव, अनिरुद्ध साळवी, डॉ. अनिलकुमार कांबळे, भाई जाधव, नामदेव चौघुले इत्यादी लोकांनी स्व. शरद दादा बोरकर यांच्या आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी उपतालुकाप्रमुख प्रकाश साळवी, धन्वंतरी क्लिनिकचे प्रमुख आणि दादा बोरकर यांचे सहकारी डॉ. अनिलकुमार कांबळे, पंचायत समितीच्या सभापती संजना माने, पंचायत समितीच्या माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य मेघना पाष्टे, शिवसेनेचे विभागप्रमुख बाबयशेठ कल्याणकर, विभाग संघटक उदय माने, शिवसेनेचे उपविभागप्रमुख नामदेव चौघुले, उपविभागप्रमुख अजीम चिकटे, माजी सैनिक रामचंद्र सावंत, वाटद सरपंच अंजली विभूते, वरवडे सरपंच विराग पारकर, अंजली पारकर, हेमंत सुर्वे, विजयराव धनावडे, अरुण मोर्ये, सुजित दुर्गवळी यांच्यासह वाटद जिल्हा परिषद गटातील सर्वच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदन उदय माने आणि आभारप्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते तुषार चव्हाण यांची केले.