सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले शरद पवार आणि भाजप नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विरोधी पक्षांचे दोन मोठे नेते एकाच व्यासपीठावर आल्यास किंवा एकत्र प्रवास केल्यास संशयाचा व चर्चेचा विषय ठरतो. सध्या अशीच एक घटना राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
महाविकास आघाडी सरकारवर एकदाही टीकेची संधी न सोडणारे रावसाहेब दानवे आणि शरद पवार एकाच गाडीने प्रवास करत असल्याचे पाहून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले शरद पवार आणि भाजप नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या या प्रवासाचे राज्यभर वेगवेगळया पद्धतीने विश्लेषण केले जात आहे. एकीकडे निवडणूक आयोगाने शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवल्याने शिवसेनेत गदारोळ माजला आहे. असे असतानाच शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसल्याने अनेकांनी याचे निरनिराळे अर्थ लावण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काल औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही त्यांच्यासोबत होते. शरद पवार औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची भाजप नेते रावसाहेब दानवे यांची खाजगीत भेट झाली. त्यानंतर शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांनी एकाच गाडीने प्रवास केला.
दरम्यान, शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवल्याबाबत शरद पवार म्हणाले की, चिन्ह गोठवल्यामुळे शिवसेना अजिबात संपणार नाही, ती आणखी जोमाने वाढेल. शिवसेनेमध्ये जी तरुणपिढी आहे, ती आणखी जोशाने काम करणारी आहे. चिन्ह असेल किंवा नसेल तरीही निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दाखवली पाहिजे, असा सल्ला पवारांनी शिवसेनेला दिला आहे.