(नवी दिल्ली)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोदींसोबत आहेत की, विरोधात आहेत याबाबत संशय वाढत चालला आहे. सर्व विरोधी पक्षनेते मणिपूरला गेले तेव्हा शरद पवार पुण्यात मोदींची पाठ थोपटत होते. दुसर्या दिवशी विरोधक राष्ट्रपतींना भेटले तेव्हा पवार त्यांच्यासोबत गेले. मात्र पत्रकार परिषदेसाठी विरोधी पक्षनेते एकत्र आले तेव्हा शरद पवार तिथून गायब झाले होते.
हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या मुद्यावरून संसदेत विरोधक केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. विरोधकांच्या 21 खासदारांच्या शिष्टमंडळाने मणिपूरला भेट दिली. तेथून आल्यावर या शिष्टमंडळासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आप नेते संजय सिंह, सपा नेते राम गोपाल यादव यांच्यासह देशभरातील इंडियाच्या प्रमुख नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यानंतर या सर्व नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र नेमके या पत्रकार परिषदेच्या आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तेथून अचानक गायब झाले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे भर पत्रकार परिषदेत त्यांना आजूबाजूला शोधू लागले. मात्र, त्यांना पवार दिसलेच नाहीत. या सर्व प्रकारामुळे शरद पवारांबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात संभ्रम आहेच. 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले, तेव्हा शरद पवारांनी त्यांची अगदी आपुलकीने भेट घेतली. औपचारिकता बाजूला ठेवत त्यांच्या पाठीवर थाप मारली. त्यातच हा राष्ट्रपतींच्या भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेचा किस्सा पुढे आला आहे.
हिंसाचारग्रस्त मणिपूर राज्यात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ‘इंडिया’चे शिष्टमंडळ गेल्या आठवड्यात गेले होते. या दौर्यात शिष्टमंडळाने मणिपूरच्या राज्यपालांची भेटही घेतली होती. मात्र त्यावेळी या शिष्टमंडळासोबत शरद पवार मणिपूरला गेले नव्हते, खासदार सुप्रिया सुळेंनीही या दौर्याकडे पाठ फिरवली.
शिवसेनेने मात्र अरविंद सावंत यांना या दौर्यासाठी आवर्जून पाठवले होते. अशातच काल मणिपूरच्या मुद्यावरून ‘इंडिया’चे नेते राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेत एक निवेदन दिले. मणिपूरच्या मुद्यावरून संसदेत निवेदन देण्याचे आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी तातडीने मणिपूरला जाण्याचे निर्देश देण्याची मागणी ‘इंडिया’च्या नेत्यांनी राष्ट्रपतींकडे केली. मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, आप नेते संजय सिंह, सपा नेते राम गोपाल यादव यांच्यासह देशभरातील नेते राष्ट्रपतींच्या भेटीत उपस्थित होते.
या भेटीनंतर मल्लिकार्जुन खरगेंच्या नेतृत्वात ‘इंडिया’च्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात सर्व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र नंतर शरद पवार तेथे आलेच नाहीत. शरद पवार उपस्थित असतील, असे खरगे यांना वाटले. त्यांनी पत्रकार परिषदेत पवारांना आजूबाजूला शोधले, पण पवार त्यांना कुठेच दिसले नाहीत. पत्रकार परिषद संपेपर्यंत शरद पवार आलेच नाहीत. राष्ट्रपतींच्या भेटीवेळी शरद पवार आले होते. मात्र पवार अचानक कुठे गेले हे मल्लिकार्जुन खरगेंना समजले नाही. एकूणच शरद पवारांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत आता संभ्रम वाढला आहे.