(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने काल संध्याकाळी याबाबतची घोषणा केली. या निर्णयाने शरद पवारांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या अटी पूर्ण करण्यात राष्ट्रवादी पक्ष सक्षम नसल्यामुळं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय.
चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी सहा टक्के मते असतील किंवा लोकसभेच्या निवडणुकीत तीन किंवा जास्त राज्यामध्ये किमान दोन टक्के मते असतील तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच निवडणूक चिन्ह मिळते. त्याशिवाय नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयाला जागा मिळते. निवडणुकीमध्ये दुर्दशन अथवा इतर सार्वजनिक वाहिन्यावर ब्रॉडकॉस्टिंगसाठी वेळ मिळतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर या सर्वासाठी पक्ष अपात्र ठरतात.
पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढताना लोकसभा 2019 चे नियम लक्षात घेतले आहेत. त्यानंतर ज्या ज्या राज्यात निवडणुका झाल्या आहेत. तेथील आकडेवारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षासह तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी आम आदमी पक्षाला (आप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देत तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. आयोगाने सोमवारी जारी केलेल्या आपल्या आदेशात उत्तर प्रदेशातील आरएलडी, आंध्र प्रदेशातील बीआरएस, मणिपूरमधील पीडीए, पुद्दुचेरीतील पीएमके, पश्चिम बंगालमधील आरएसपी आणि मिझोराममधील एमपीसी यांना दिलेला राज्य पक्षाचा दर्जाही रद्द केला आहे. दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांतील निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत आहे.
आयोगाने म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर NCP आणि TMC यांना अनुक्रमे नागालँड आणि मेघालयमध्ये राज्यस्तरीय पक्ष म्हणून ओळखले जाईल.
का हिरावून घेतला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा? कोणत्या अटी कराव्या लागतात पूर्ण
1. पक्षाच्या उमेदवारांनी किमान ४ राज्यांमधील गेल्या राष्ट्रीय निवडणुकीत प्रत्येक राज्यात एकूण मतदानाच्या किमान ६ टक्के मते मिळवली. याशिवाय लोकसभेच्या किमान ४ जागा जिंकायच्या आहेत.
2.राष्ट्रीय पातळीवरील पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान २ टक्के जागा जिंकणे अनिवार्य आहे. पक्षाचे उमेदवार किमान तीन राज्यांमधून निवडून आले पाहिजेत.
3. किमान ४ राज्यांमध्ये पक्षाला ‘राज्य पक्ष’ म्हणून मान्यता मिळावी, अशीही अट आहे.
यापूर्वी देशात ७ राष्ट्रीय पक्ष होते – तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भाजपा, सीपीआय, सीपीआय (मार्क्सवादी), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आता NCP, TMC आणि CPI चा राष्ट्रीय दर्जा काढून या यादीत AAP चा समावेश केल्याने आता एकून राष्ट्रीय पक्ष ५ झाले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘एवढ्या कमी वेळात राष्ट्रीय पक्ष? हा चमत्कारापेक्षा कमी नाही. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. देशातील कोट्यवधी जनतेने आपल्याला येथे पोहोचवले आहे. जनतेला आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आज लोकांनी आमच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे.