(मुंबई)
सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा तुम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण झाली का?, असा सवाल एकनाथ शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या अडीच वर्षांत तीनदा मंत्रालयात आले होते. यासाठी त्यांची गिनीज बुकामध्ये नोंद झाली आहे. तर सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा तुम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण झाली का?, असा बोचरा सवाल एकनाथ शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवस-रात्र काम करत आहेत. मुख्यमंत्री कसा असावा हे शिंदे यांनी दाखवून दिल्याचे सांगून ते म्हणाले, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे हे दोन्ही व्यक्ती अनुभवी आहेत. ‘एक से भले दो’ याप्रकारे ते महाराष्ट्र विकासाचा गाडा पुढे नेत आहेत. त्याचा मला अभिमान वाटत आहे. हा मुख्यमंत्री आमचा आहे, ही भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवत शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या योग्य कामांचा पाढा त्यांनी वाचला. ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांना १५ लाख रुपयांत घरे हा सगळ्यात चांगला आणि मोठा निर्णय तातडीने घेतला. जे पोलिस दिवसरात्र रक्षणासाठी काम करतात, त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.
एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रिकांत शिंदे यांनी कोकणवासीयांसाठी खास जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी ४०० बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. यावरून रामदास कदम यांनी श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. त्यामुळे स्वत:साठी जगाला तो मेला. जो दुसऱ्यासाठी जगला तो खऱ्या अर्थाने जगाला, असेही ते पुढे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी त्यांची भावनात्मक डायलॉ़गबाजी थांबवावी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे असं सांगत किती दिवस महाराष्ट्राला ब्लॅकमेल करणार आहात, असा थेट सवालच रामदास कदमांनी विचारला आहे. पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर मी देखील महाराष्ट्रात फिरणार. नेमकी वस्तुस्थिती महाराष्ट्राला सांगणार आहे. आजवर उद्धव ठाकरेंना जे काही मिळालं ते शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मिळालं. तर आदित्य ठाकरेंना जे पक्षात, सत्तेत जे स्थान मिळालं ते उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून मिळालं असल्याचं सांगत पक्ष संघटना कुणी वाढवली हे जनतेला माहिती आहे असे कदम यांनी सांगितले.