(चिपळूण)
शब्दसुगंध या पुस्तकाच्या माध्यमातून संस्काराचा सुगंध सर्व दूर पोहोचेल. या पुढच्या काळात देखील भाई जाधव यांच्याकडून चांगले साहित्य निर्माण होईल. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी निर्माण केलेले साहित्य एक आदर्श आहे. त्यातून भावी पिढीला संस्कार मिळेल, असे उद्गार चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी काढले. त्यांच्या उपस्थितीत भाई जाधव यांनी लिहिलेल्या शब्दसुगंध या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
शहरातील माधव सभागृहात दिनांक 29 रोजी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर देवरुख कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ सुरेश जोशी, ज्येष्ठ साहित्यिक अरुण इंगवले, रिगल संस्थेचे अध्यक्ष संजय शिर्के, सौ सुनीता शिर्के, संजीव आणेराव रामदास जाधव, प्रकाश साळवी तसेच श्री भाई सौ राजश्री जाधव उपस्थित होते. डॉक्टर सुरेश जोशी यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले.
यावेळी चिपळूण , निरव्हाळ , रामपूर पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते . यावेळी बोलताना आ निकम म्हणाले ,भाई जाधव यांचे कुटुंब व स्व गोविंदराव निकम यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते .कदाचित आपण यामध्ये कमी पडलो आहोत मात्र आता पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने हे संबंध अधिक दृढ होतील. भाई जाधव यांनी राजकारणावर टीका टिप्पणी केली आहे ते लोककलाकार तसेच समाजप्रिय आहेत .हे त्यांच्या लेखनातून कळते या पुढच्या काळात त्यांनी असेच लेखन करावे त्यातून समाज प्रबोधन घडेल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी शतक पूर्ण करावे आणि या कालावधीत लेखन करून प्रकाशनाला आम्हाला बोलवावे असे आ निकम यांनी सांगितले.
यावेळी डॉ सुरेश जोशी यांनी अध्यक्षीय भाषण करताना सांगितले की, तुकाराम उर्फ भाई जाधव यांचे लेखन कोणत्याही साहित्यिक नियमाला धरून अवलोकन करता येणार नाही .कारण साहित्यही एक निर्मिती असते . बहिणाबाई शिकल्या नव्हत्या पण त्यांचे साहित्य सकस होते . त्यामुळे या साहित्याला देखील कोणतेही निकष लावणे योग्य नाही. उत्कट भावनांचा तो अविष्कार आहे. असे प्रा . जोशी यांनी सांगितले . यापुढे देखील भाई जाधव यांनी सकस साहित्य निर्माण करावे यातून भावी पिढीला चांगले आदर्श घालून द्यावेत .त्यांनी अनेक प्रकारे साहित्य निर्माण केले. कविता, चारोळी, आरती, गवळण, कथा इतकेच काय दोन ओळी हा प्रकार देखील त्यामध्ये आहे. हा प्रयत्न निश्चितच आदर्शवत आहे. भावी पिढीला त्यातून बोध मिळेल असे त्यांनी सांगितले .
याप्रसंगी या पुस्तकाचे संपादन करणारे अरुण इंगवली यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. लोककलाकार आणि समाजप्रिय व्यक्तीकडून अशा प्रकारचे लेखन होत असते .त्यामुळे ही मुक्त कलाकृती आहे असे सांगताना शब्द सुगंध या पुस्तकाची स्तुती केली. याप्रसंगी संजीव आणेराव यांनी प्रास्ताविक केले .रिगलचे शिर्के यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि आमदार शेखर निकम यांचा देखील संयोजक शेखर जाधव यांनी सत्कार केला. आभार श्री नंदकुमार शिंदे व वैद्य यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी शेखर जाधव यांनी मेहनत घेतली. यावेळी जाधव परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
फोटो : शब्दसुगंध पुस्तकाचे प्रकाशन करताना आ शेखर निकम, प्रा. डॉ सुरेश जोशी, अरुण इंगवले, संजय शिर्के, भाई जाधव, सौ राजश्री जाधव आदी मान्यवर