(मुंबई)
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या एक ते दोन दिवसांमध्ये होईल. विस्तारासाठी आम्ही तयारीमध्ये बसलो आहोत. आम्हाला कधीही कॉल येईल आणि तसे आम्ही निघू, आम्हाला आणि भाजपाला प्रत्येकी सात मंत्रिपदे मिळतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी मंगळवारी केला. पालकमंत्रि पद रायगडला आणि तेदेखील मला मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. मला मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी तसा शब्द दिला असून ते शब्द पाळतील, असा विश्वास गोगावले यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र गोगावले यांच्या या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता नसल्याचे दिसत आहे.
राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह २९ मंत्री आहेत. नियमानुसार मंत्रिमंडळात ४३ मंत्र्यांचा समावेश करता येऊ शकतो. त्यामुळे शिंदे मंत्रिमंडळात आणखी १४ जणांना संधी मिळू शकते. मात्र, गोगावले यांनी शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी सात मंत्रिपदे मिळणार असल्याचा दावा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य आमदारांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पवार गटातील ज्येष्ठांना चांगली खाती मिळतीलच असं नाही- उदय सामंत
छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना त्यांच्या अनुभवानुसार चांगली खाती मिळायला हवीत. तशी त्यांनी मागणी करणेही रास्त आहे. पण त्यांना चांगली खाती मिळतीलच असे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे खाते वाटपाचा योग्य तो निर्णय घेतील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होणार होता, झाला नाही. मंगळवारी होणार होता झाला नाही. आता बुधवार किंवा गुरुवारची वाट बघू. पण मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होईल, असे उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांना संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण माहीत आहे. ते प्रत्येक जागेनुसार योग्य तो निर्णय घेतील. विकासासाठी पालकमंत्री महत्त्वाचा असतो. याबाबत योग्य तो निर्णय हे तिन्ही प्रमुख नेते घेतील. आमच्यामध्ये कोणताच वाद नाही. आमचे तिन्ही नेते समन्वयाने यातून मार्ग काढतील, असे उदय सामंत यांनी सांगितले