(रत्नागिरी)
शहराच्या जवळच असणाऱ्या चंपक मैदानात व्हेल माशाची उलटीची विक्री करताना सापडले होते. या प्रकरणी मालवण, देवगड येथील चार संशयितांची न्यायालयाने प्रत्येकी ५० हजारांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली.
यामध्ये विकास अनंत मेस्त्री (४८, रा. जामसंडे, तरवाडी), समिर विठ्ठल तेली (३९, रा. बगाडवाडी, मालवण), राजेश मोतिराम जगताप (३४, रा. साईनाथवाडी, देवगड), महेश मनोहर ठुकरूल (४८ रा. जामसंडे, सध्या बोरिवली-मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना ६ नोव्हेंबरला सायंकाळी आठच्या सुमारास शहराजवळील चंपक मैदान येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालवण, देवगड येथील संशयित व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आले असताना पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून १८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.