(मुंबई)
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे शिवसेनेच्या ४० आमदारांची रविवारी बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावण्याचा निर्णय झाला. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. या ५५ आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे व ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये व्हीपवरुन हमरातुमरी झाली.
अधिवेशनाला उपस्थित राहावे यासाठी हा व्हीप असून कोणी त्याचा भंग केला तरी त्या आमदाराविरोधात कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी दिले. विशेष म्हणजे यासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे कोणीही म्हणजे शिंदे आणि ठाकरे गटाने व्हीप बजाऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. असे असतानाही शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाने ठाकरे गटाच्या १५ आमदारांना व्हीप बजावल्याने संताप व्यक्त होत आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. ९ मार्च रोजी फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाची सर्वांनाच उत्सुकता आहे. तत्पूर्वी एक दिवस म्हणजे ८ मार्च रोजी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येईल. यंदाचा अर्थसंकल्प ६ लाख कोटी रुपयांचा असणार आहे. तर अधिवेशनात कांद्याचे गडगडलेले दर, बिघडलेली कायदा सुव्यवस्था, सरकारच्या प्रसिद्धीवर होणारा वारेमाप खर्च तसेच जिल्हा नियोजन समितीची रखडलेली विकासकामे आदी विषयांवर खडाजंगी होण्याची शक्यता आहे.