(खेड/इक्बाल जमादार )
दापोली मध्ये एक असा प्रकार घडला आहे, जे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. व्हीआयपी लोकांसाठी असलेल्या दालनात चक्क कुत्रे बेडवर बसून एसीची हवा घेतानाचा फोटो व्हायरल होत आहे. या व्हीआयपी दालनातील अधिकाऱ्याने आपल्या दालनाला बाहेरून कुलूप लावून फिरायला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सर्वजनिक बांधकाम विभागाच्या दापोली येथील शासकीय विश्रामगृहातील व्हीआयपी सूटमध्ये AC सुरू ठेवून चक्क एक कुत्र्याची जोडी बेडवर आराम करताना पाहून या ठिकाणी आलेल्या पत्रकारांना काल गुरुवारी आश्चर्याचा धक्काच बसला. या कुत्र्याच्या जोडीला या दालनात ठेवून कुलूप लावून त्याचे मालक बाहेर फिरायला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराने शासकीय मालमत्तेचा कसा दुरुपयोग केला जातो हे समोर आले आहे.
जागरुक पत्रकार दापोली येथे शासकीय विश्रामगृह येथे गेले असता त्यांना या विश्राम घरातील व्हीआयपी सूट मध्ये कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. याठिकाणी पत्रकार कक्षाजवळ गेले असता बाहेरून कुलूप असल्याचे दिसले. तर या सूट मधील एसी सुरू असल्याचे जाणवले. पत्रकारांनी या कक्षाच्या खिडकीतून आत पाहिले असता त्यांना ज्या बेडवर महत्त्वाच्या व्यक्ती आराम करतात त्याच बेडवर कुत्रा जोडी बसून आराम करत असल्याचे दिसून आले.
याबाबत पत्रकारांनी विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्यांकडे हा व्हीआयपी सूट कुणाला दिला आहे, अशी विचारणा केली असता या सुटचे बुकींग तहसीलदाराच्या पत्रानुसार करण्यात आले असून आठ ते अकरा मे पर्यंत सुटचे बुकींग करण्यात आले असल्याची माहिती दिली. आलेल्या अधिकाऱ्याची नोंद विश्रामगृहाच्या नोंदवहीत करण्यात आली आहे का? अशी विचारणा केली असता सूट सोडताना ही नोंद केली जात असल्याची माहिती या कर्मचाऱ्याने दिली त्यामुळे हा सूट नक्की कोणाला दिला गेला आहे याची माहिती मिळू शकली नाही. यासंदर्भात सर्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पटेल यांच्याशी संपर्क साधला असता या अधिकार्याचे बुकिंग 11 मेपर्यंत होते. आम्ही त्यांना हा सोडण्यासंदर्भात सांगितले होते. मात्र बुधवारी तारीख 11 पर्यंत त्यांनी हा सूट सोडलेला नाही.
या सर्व प्रकारानंतर तहसील कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तहसीलदार यांच्या कक्षात नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याकडून माहिती उपलब्ध न झाल्याने निवासी तहसीलदारांना विचारले असता हा कक्ष तहसीलदार दापोली यांच्या नावाने आरक्षित असल्याची माहिती दिली गेली. मात्र या कक्षात कोण अधिकारी उतरलेले आहेत याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान हे जोडपे विश्रामगृहात आल्याची माहिती मिळाली आणि ते पुन्हा शासकीय विश्रामगृहातून घाईघाईने कुत्र्याला बाहेर काढून आपल्या गाडीत बसवत असल्याचे दिसले. यावेळी त्या जोडप्याचे नाव, गाव विचारले असता त्यांनी काही सांगण्यास नकार दिला. दापोलीचे उपविभाग अधिकारी शरद पवार यांनी ही व्यक्ती निवृत्त आय ए एस अधिकारी असल्याचे सांगितले.
उप विभागीय अधिकारी निर्देश आणून दिल्यानंतर ह्या बाबत आपण योग्य ती माहिती घेऊ असेही सांगितले. या प्रकारामध्ये सध्या दापोलीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे