(श्रीहरीकोटा)
चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोकडून पुढील अंतराळ मोहिमेची तयारी सुरू झाली आहे, इस्रोने आता ‘गगनयान’ मोहिमेची तयारी सुरू केली आहे. गगनयान मोहीम इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहिमेद्वारे अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. परंतु याआधी इस्रोकडून मोहिमेची चाचणी होईल. इस्रो लवकरच गगनयानचे ट्रायल मिशन लाँच करणार आहे, ज्यात मानवाआधी रोबोटला अंतराळात पाठवले जाईल.
भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेला ‘गगनयान’ असं नाव देण्यात आलं आहे. परंतु गगनयानाच्या फायनल मिशनआधी ट्रायल मिशन होणार आहे. गगनयानाच्या प्रत्यक्ष उड्डाणापूर्वी तीन चाचणी मोहिमा केल्या जातील. या तीन चाचणी मोहिमा मानवरहित असतील. यातील पहिल्या ट्रायल मिशनचं लाँचिंग एक ते दीड महिन्यांत होण्याची शक्यता आहे. यात मानवविरहीत यान रॉकेटच्या माध्यमातून अंतराळात पाठवलं जाईल. यात रिकवरी सिस्टीम आणि टिमची पडताळणी होईल.
मानवाला अंतराळात पाठवण्याआधी रोबोटला अंतराळात पाठवलं जाईल आणि त्यावर चाचणी केली जाईल. ‘गगनयान’ अंतराळ मोहिमेसाठी इस्रोकडून रोबोट तयार केला जात आहे. ‘गगनयान’ मिशनच्या आधी रोबोटिक चाचणी होईल, त्यानंतर मानवाला अंतराळात पाठवलं जाईल. पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये ‘व्योममित्र’ रोबोट अंतराळात पाठवला जाईल.
इस्रोने ‘व्योममित्र’ नावाचा महिला रोबोट तयार केला असून तो चाचणीसाठी अवकाशात पाठवला जाईल. हा ‘हाफ- मुनॉइड’ रोबोट अवकाशातून इस्रोला सर्व अहवाल पाठवणार आहे. हा रोबोट अंतराळातील मानवाच्या सुरक्षेबाबत सर्व तपशील इस्रोला देईल. या रोबोटला अंतराळात पाठवण्याचा उद्देश हा मानवी शरीराच्या हालचालींना समजून घेणं असेल. या रोबोटलाला जगातील ‘बेस्ट स्पेस एक्सप्लोर मेनॉयड रोबोट’ म्हणून किताब मिळाला आहे. सध्या हा रोबोट बंगळुरूत असून तो मानवाप्रमाणेच काम करतो.