(नवी दिल्ली)
देशातील महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा वाढत असून आता हा बोजा आणखी वाढणार आहे. देशातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरील सवलत आता रद्द करण्यात आली आहे. यामुळे व्यावसायिक सिलिंडरवर मिळणारी २०० ते ३०० रुपयांची सवलत आता बंद झाली आहे. त्यामुळे आता हे सिलिंडर कमी किमतीत मिळणार नाहीत. सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरवर सवलत देताना घरगुती एलपीजी सिलिंडरवरील तोटा भरून काढण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यामुळे किमतींच्या दरात असमानता दिसून येत होती. ती दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
व्यावसायिक सिलिंडरवर अधिक सवलत देणा-या वितरकांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि एचपीसीएल आणि बीपीसीएल या तीन सरकारी तेल कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना ही सवलत बंद करण्यास सांगितले आहे. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०२२ पासून लागू करण्यात आला असून यासंदर्भात आदेशही आले आहेत.
एचपीसीएलने १९ किलो आणि ४७.५ किलोच्या सिलिंडरसाठी नवी किंमत लागू केली आहे. तसेच इंडियन ऑइलने १९ किलो आणि ४७.५ किलोचे सिलिंडर ग्राहक आणि वितरकाला कोणत्याही सवलतीशिवाय विकले जावेत, असा आदेशही जारी केला आहे.