(तौराबा)
भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजवर २०० धावांनी दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने वनडे मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५१ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव पत्त्याच्या डावासारखा गडगडला आणि त्यांचे १७ वर्षांपासूनचे मालिका विजयाचे स्वप्न अधुरेच राहिले. कारण वेस्ट इंडिजने यापूर्वी भारताविरुद्ध वनडे मालिका ही २००६ साली जिंकली होती. या सामन्यापूर्वी दोन्ही संघा १-१ अशा बरोबरीत होते. त्यामुळे वेस्ट इंडिजला यावेळी इतिहास रचण्याची संधी होती. पण तिसऱ्या सामन्यात त्यांचा पराभव झाला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ विकेट गमावून ३५१ धावा केल्या होत्या. तिस-या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला विजयासाठी ३५२ धावांचे आव्हान दिले. भारताकडून ४ फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर हार्दिक पांड्याने फिनिशिंग टच दिला. त्यामुळे भारताने निर्धारित ५० षटकात ५ विकेटच्या मोबदल्यात ३५१ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजची अवस्था बिकट झाली. कारण अवघ्या १५ षटकांतच ६० धावांत अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यामुळे भारताच्या मालिका विजयाचा मार्ग मोकळा झाला.
भारताने दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची आघाडी फळी ढेपाळली. विडिंजचा संपूर्ण डाव 151 धावांत संपुष्टात आला. विडिंजच्या तळाच्या फलंदाजांनी जिगरबाज फलंदाजी करत मोठी नामुष्की टाळली. शार्दूल ठाकूर याने चार विकेट घेतल्या तर मुकेश कुमार याने तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या. तिसरा सामना जिंकून भारतीय संघाने मालिका २-१ च्या फरकाने जिंकली.
सलामीवीर इशान किशन आणि शुभमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. त्याने ६४ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. त्याला शुभमन गिलची चांगली साथ मिळाली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागिदारी करत चांगला पाया रचला. इशान किशन बाद झाल्यानंतर शुभमन गिलने डावाची सुत्रे हातात घेतली. गिलने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर आक्रमक फलंदाजी केली. त्यानेही मोठी भर घातली. मराठमोळ््या ऋतुराज गायकवाडला संधीचे सोने करता आले नाही. गायकवाड ८ धावा काढून तंबूत परतला.
त्यानंतर शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी एकेरी दुहेरी धावसंख्यासोबत चौकार आणि षटकार ठोकले. संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करीत ४१ चेंडूत ५१ धावांची खेळी साकारली. संजू बाद झाल्यानंतर गिलही तंबूत परतला. गिल आणि सॅमसनने तिस-या विकेटसाठी ६९ धावांची भागिदारी केली तर गिलने ९२ चेंडूमध्ये ८५ धावांचे योगदान दिले. गिल परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी धावसंख्या हालती ठेवली. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. पण मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादव बाद झाला. त्याने ३५ धावांचे योगदान दिले. यादव आणि पांड्या यांनी ६५ धावांची भागिदारी केली.
हार्दिक पांड्याचा फिनिशिंग टच
पांड्याने अखेरच्या षटकांत वादळी फलंदाजी केली. त्याने रविंद्र जडेजाला हाताशी धरत भारताची धावसंख्या ३५० पार नेली. पांड्याने नाबाद ७० धावांची खेळी केली. यावेळी त्याने पाच गगनचुंबी षटकार ठोकले. त्याशिवाय ४ खणखणीत चौकारही लगावले. जडेजाने नाबाद ८ धावांची खेळी केली. पांड्या आणि जडेजा यांनी १९ चेंडूत नाबाद ४२ धावांची भागिदारी केली.
वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने दोन बळी घेतले. अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती आणि यानिक कारिया यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. मात्र, मोतीशिवाय वेस्ट इंडिजचे सर्व गोलंदाज धावा रोखण्यात अपयशी ठरले.