(गुहागर)
वर्षभराच्या कालावधीत झालेल्या खर्चाची माहिती तात्काळ मिळावी म्हणून अर्ज केलेला असताना ती माहिती देण्यास सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. तसेच सुट्टीच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालय उघडून सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यासह इतर ग्रा.पं.चे ग्रामसेवक आढळून आल्याने वेळंब ग्रा.पं.चे उपसरपंच श्रीकांत मोरे यांनी गुहागर पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२२- २३ या कालावधीमध्ये झालेल्या खर्चाची माहिती साक्षांकित प्रतीसह तात्काळ मिळावी म्हणून उपसरपंच मोरे यांनी २९ डिसेंबर रोजी ग्रा.पं.कडे अर्ज केला होता. मात्र, सदर माहिती देण्यास सरपंच समिक्षा बारगोडे व ग्रामविकास अधिकारी मंगेश पांचाळ यांनी टाळाटाळ केली. तसेच सदर माहिती आपल्याला मासिक सभेत दाखविण्यात येईल असे सांगितले मात्र, आजतागायत कोणतीही माहिती पहावयास दिली नसल्याचे मोरे यांनी अर्जात नमूद केले आहे.
तसेच शनिवार ६ जानेवारी २०२४ रोजी सुट्टीच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी मोरे कार्यालयात गेले असता तेथे सरपंच, एक सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्यासह साखरीआगर ग्रामसेवक अनंत गावणंग, मढाळ पालीचे चंद्रकात गोरीवले हे तेथे उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांना मोरे यांनी याबाबत विचारणा केली असता गावणंग यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही येथे आलो असल्याचे सांगितले. यावर मोरे यांनी त्यांना गटविकास अधिकाऱ्यांचे पत्र आहे का ते विचारले असता नसल्याचे त्यांनी सांगितले. याचवेळी वेळंब ग्रा.पं.च्या तत्कालीन ग्रामसेविका सुलभा बड यासुध्दा येथे दाखल झाल्याने मोरे यांची शंका बळावली.
अहवाल कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश
वेळंब उपसरपंच मोरे यांच्या तक्रार अर्जानुसार, गुहागर गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांनी पं.स. विस्तार अधिकारी एस. एस. भांड यांना याप्रकरणाची चौकशी करण्याचे व त्यानुसार कारवाई करावी, असे सूचित करुन याबाबतचा अहवाल कार्यालयाकडे सादर करावा, असे आदेश दिले आहेत.