(खेड / भरत निकम)
महामार्गावरील वेरळ येथील हाॅटेल गणपती कृपा समोरच्या पान टपरीवर सिगारेट ओढत असलेल्या इसमाला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर डोक्यात बियरची बाटली फोडून जखमी केले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील सुकिवली कुणबीवाडी येथील संदीप विश्राम धाडवे (३१) हे रेल्वे स्टेशन येथील काम संपवून घरी निघाले होते. महामार्गावर हाॅटेल गणपती कृपा समोरील पान टपरीवर सिगारेट ओढत थांबले होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्काॅर्पिओतून साहिल मोरे आणि शैलेश चव्हाण हे दोघे उतरले. शैलेश हा संदीप यांना शिवीगाळ करत मारहाणीस धावून जात होता. तेथे स्वप्नील घाडगे व निलेश जगताप हे दोघे आले. यातील स्वप्नील याने ‘तुला लय मस्ती आहे’, असे म्हणत स्वप्नील याने कानाखाली मारले. त्यावेळी निलेशने संदीप यांचे हात पकडून ठेवले होते.
घडलेल्या घटनेची माहिती संदीप यांचा सहकारी समीर कदम याने संदीप यांचा भाऊ शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख सचिन धाडवे यांना दिली. ते गावातील काही तरुणांसोबत तिथं पोहोचले. तेव्हा मारहाण करणारे पळून जात होते. संदीप यांनी त्यांना जाब विचारला असता, संदीप यांना हाताच्या ठोशाने मारहाण केली. त्यावेळी सुशांत घाडगे हा तिथे आला. त्याने हातातील बियरची संदीप यांच्यावर उगारली. तेव्हा तेथे असलेल्या सुधीर परशुराम राणीम हा मधे आल्यावर त्यांच्या डाव्या कानाच्या वरील बाजूस लागल्याने ती फुटली आणि त्याला गंभीर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी संदीप यांनी पोलिस ठाण्यात घटनेची फिर्याद दाखल केली. स्वप्नील रंगराव घाडगे (३८, रा. योगायोग सोसायटी, खेड), निलेश रामचंद्र जगताप (३६), सुशांत रंगराव घाडगे (३०) आणि शैलेश भगवान चव्हाण (३४, रा. वेरळ, ता.खेड) अशा चौघांविरुद्ध भादवि कलम ३२४, ३२३, ४२७, ५०४ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.