(मुंबई)
गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज भालजी पेंढारकर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपट बनवून इतिहास घडवला आहे. अलीकडेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक पाऊल पुढे टाकत छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहासाचे एक पर्व समोर आणले आहे. शिवकाळातील सात नायकांचे महत्त्व चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली. याच प्रसंगी अक्षय कुमारच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चित्रपटाच्या नावाच्या अनुषंगाने एक मिश्किल टिप्पणी केली. त्यांनी “वेडात मराठे वीर दौडले ४०” चे प्रोड्युसर, दिग्दर्शक आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, असा उल्लेख केला आणि मंचावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आणि स्प्लिट्सविला विजेता जय दुधाणे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याखेरीज प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विराट मडके, सत्या मांजरेकर, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि नवाब शहा हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग यावर्षी डिसेंबर महिन्यात सुरु होईल आणि हा चित्रपट २०२३मध्ये प्रदर्शित होणार आहे.